इंडिया आघाडीला देश अस्थिर करायचाय! चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर प्रहार

काँग्रेसने देशाला अस्थैर्याच्या खाईत लोटले, असा आरोप करीत ते म्हणाले की, अस्थिर सरकारचे काय परिणाम होतात हा अनुभव महाराष्ट्राने अडीच वर्षे घेतला. महाराष्ट्रातील मविआ सरकार हे फक्त कमिशन घेणारे सरकार होते. ‘कमिशन द्या, अन्यथा प्रकल्प थांबवा’ असे सांगून आधीच्या फडणवीस सरकारने सुरू केलेले अनेक लोकहिताचे प्रकल्प महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने थांबवले.
इंडिया आघाडीला देश अस्थिर करायचाय! चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर प्रहार

अविनाश पाठक/चंद्रपूर

२०२४ ची लोकसभा निवडणूक ही स्थिर सरकार विरुद्ध अस्थिर सरकार अशी निवडणूक होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही देशाला स्थैर्याकडे नेऊ पाहत आहे, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला हा देश अस्थिर करायचा आहे, असा जोरदार प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथील जाहीरसभेत विरोधकांवर केला.

भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी चंद्रपूर येथे आयोजित सभेला मोदी संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेसने देशाला अस्थैर्याच्या खाईत लोटले, असा आरोप करीत ते म्हणाले की, अस्थिर सरकारचे काय परिणाम होतात हा अनुभव महाराष्ट्राने अडीच वर्षे घेतला. महाराष्ट्रातील मविआ सरकार हे फक्त कमिशन घेणारे सरकार होते. ‘कमिशन द्या, अन्यथा प्रकल्प थांबवा’ असे सांगून आधीच्या फडणवीस सरकारने सुरू केलेले अनेक लोकहिताचे प्रकल्प महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने थांबवले. मुंबईचा मेट्रो प्रकल्प, कोकणातील रिफायनरी, विदर्भातील समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार प्रकल्प हे सर्व प्रकल्प या महाआघाडी सरकारने कमिशनसाठी थांबवले, अशी टीका त्यांनी केली. आमच्या सरकारने हे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेस पक्ष हा समस्यांची जननी असल्याची टीकाही मोदींनी केली. आज काँग्रेसलाच इतक्या समस्या आहेत की त्यांनी देशातील जनाधार गमावला आहे. देशाचे विभाजन काँग्रेसनेच केले आणि काश्मीरची समस्या ही काँग्रेसने चिघळवली, असा आरोपही त्यांनी केला. नक्षलवादाला खतपाणी घातल्यामुळे गडचिरोलीसारख्या संपन्न क्षेत्राचा विकास थंडावला. आम्ही नक्षलवाद देखील आटोक्यात आणला आहे आणि आता नक्षलवादासाठी ओळखली जाणारी गडचिरोली ही ‘पोलाद सिटी’ म्हणून ओळखली जाणार आहे, असे त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.

बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत!

बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोदींनी कौतुक केले, तर शिवसेना ठाकरे गटाचा उल्लेख त्यांनी नकली शिवसेना असा केला. देशात आतंकवादाला संरक्षण कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी नाकारले? राम मंदिर उभारणीत अडथळा कोणी आणला? असे विविध प्रश्न उपस्थित करून त्यांनी काँग्रेसची पोलखोल केली. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी शुद्ध मराठीत केली. चंद्रपूर येथे महाकालीच्या पावनभूमीत मी आलो असून महाकालीच्या चरणी मी वंदन करतो आणि देशभरातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो, असे त्यांनी शुद्ध मराठीत सांगून पहिल्याच वाक्याला उपस्थित मने जिंकली. चंद्रपूरने राम मंदिर आणि संसद भवन यासाठी लागणारे लाकूड पुरवल्याचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.

सभेच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभृतींनी सभेला संबोधित केले. यावेळी उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांचीही भाषणे झाली.

काँग्रेसची अवस्थाकडू कारल्यासारखी!

काँग्रेसला पुन्हा एकदा देशाचे विभाजन करायचे आहे. काँग्रेसची अवस्था कडू कारल्यासारखी आहे. कारले तुपात तळले किंवा साखरेत घोळले तरी ते कडूच असते. त्याचप्रमाणे काँग्रेसही काहीही केले तरी कडूच राहणार आहे, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. नरेंद्र मोदी देशात कुठेही जातात तर काश्मीर समस्येचा उल्लेख करतात, असा आरोप काँग्रेसजन करतात याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, काश्मीर हा भारताचा भाग नाही का? छत्रपती शिवाजी किंवा लोकमान्य टिळकांनी काश्मीर किंवा दिल्ली ही आपलीच मानली होती ना! स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी काश्मीरमध्ये आतंकवाद वाढला त्यावेळी दुःख व्यक्त केले होतेच ना. मग आम्ही काश्मीरबद्दल बोललो तर त्यात चूक काय? असा सवाल त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in