भाजपसाठी देश प्रथम, काँग्रेसचे कुटुंबाला प्राधान्य; राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांची टीका

देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा आम्हाला सेवेची संधी दिली. आमच्या विकासाचे मॉडेल जनतेने पारखून घेतले असून त्याला समर्थन दिले आहे.
भाजपसाठी देश प्रथम, काँग्रेसचे कुटुंबाला प्राधान्य; राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांची टीका
ANI
Published on

नवी दिल्ली : देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा आम्हाला सेवेची संधी दिली. आमच्या विकासाचे मॉडेल जनतेने पारखून घेतले असून त्याला समर्थन दिले आहे. भाजपसाठी देश प्रथम असून काँग्रेसमध्ये एकाच कुटुंबाला प्राधान्य दिले जात आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले की, आमच्या सरकारने एससी-एसटी कायदा सशक्त करून दलित व आदिवासी समाजाला सन्मान दिला. देशात आज जातीयवादाचे विष पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही सर्वसामान्य वर्गातील गरीबांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचे सर्वांनी स्वागत केले. एससी, एसटी व ओबीसींनी या निर्णयाला पाठिंबा दिला, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली

काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली. असे सांगून मोदी म्हणाले की, वर्तमानपत्रावर निर्बंध लादले व लोकशाहीचे पुजारी असल्याचे सांगून जगभरात फिरू लागले. नेहरू पंतप्रधान असताना मुंबईतील कामगारांनी संप केला. तेव्हा गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी कविता सादर केली. तेव्हा सुल्तानपुरी यांना तुरुंगात पाठवले. हृदयनाथ मंगेशकर यांची वीर सावरकर यांच्यावरील कवितेचे आकाशवाणीवरून प्रसारण रोखण्यात आले. त्यांना आकाशवाणीवरून हाकलून दिले. अभिनेता देव आनंद यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला नाही तेव्हा त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली, असे मोदी म्हणाले.

डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसनेच द्वेष केला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने द्वेष केला. डॉ. आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसने काय काय केले, याचा पाढाच मोदी यांनी वाचला. त्यांना ‘भारतरत्न’ही दिला नाही. या देशातील जनतेने डॉ. आंबेडकर यांच्या भावनांचा आदर केला. त्यामुळे जबरदस्तीने काँग्रेसला ‘जय भीम’ बोलावे लागत आहे. काँग्रेसने अन्य पक्षांची सरकारे अस्थिर केली. त्यामुळे काँग्रेसची अशी परिस्थिती झाली आहे, असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in