नलबारी (आसाम) : आपण २०१४ मध्ये जनतेसमोर मोठ्या आशेने गेलो होतो, २०१९ मध्ये विश्वासाने गेलो होतो आणि आता २०२४ मध्ये गॅरंटी घेऊन जात आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
देशभरात मोदींची गॅरंटी आहे आणि या गॅरंटीची पूर्तता करण्याची आपण गॅरंटी देत आहोत, असेही मोदी म्हणाले. येथील बोरकुरा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीरसभेत ते बोलत होते. ईशान्य भारतामध्ये काँग्रेसने केवळ समस्याच निर्माण केल्या, पण भाजपने त्यांनाच शक्यतेचा स्रोत बनविले, काँग्रेसने घुसखोरीला खतपाणी घातले, पण मोदी यांनी जनतेत जाऊन या प्रदेशात शांतता प्रस्थापित केली. काँग्रेसने जे ६० वर्षात प्राप्त केले नाही ते मोदींनी केवळ १० वर्षात प्राप्त केले, असेही ते म्हणाले.
पुढील पाच वर्षे कोणताही दुजाभाव न करता सर्वांना मोफत रेशन दिले जाईल, ७० वर्षांवरील वृद्धांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार आयुष्मान योजनेखाली उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.