पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी 'ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो' या भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

थिम्फू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी 'ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो' या भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर असून त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळविणारे ते परदेशातील पहिलेच नेते आहेत. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी मोदींना पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार आपण १४० कोटी भारतीयांना समर्पित करतो, असे मोदी यांनी 'एक्स'वरून जाहीर केले आहे.

भारत-भूतान संबंध वृद्धिंगत करण्यात त्याचप्रमाणे भूतान देश आणि देशवासीय यांच्यासाठी उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल हा पुरस्कार मोदी यांना देण्यात आला आहे. भूतानच्या ११४ व्या राष्ट्रीय दिनानिमित्त १७ डिसेंबर २०२१ रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, मोदी यांचे भूतानमध्ये आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आणि त्याबद्दल मोदी यांनी भूतानमधील जनतेचे आभार मानले. भारत आणि भूतान यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होतील, नवी उंची गाठतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या पुरस्कारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून भारतातील १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने भूतानच्या या महान भूमीतील हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो. तसेच या सन्मानासाठी भूतानचे आभार मानतो.”

भूतानची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारत सदैव तुमच्या पाठीशी आहे. ‘बीबी’ म्हणजेच ब्रँड भूतान आणि भूतान बिलिव्ह या संकल्पनांना भारताचा पाठिंबा असेल. आगामी पाच वर्षांत भारत-भूतान संबंधांना नवी ऊर्जा मिळेल. दळणवळण, पायाभूत सुविधा, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात संधी निर्माण करण्यासाठी आपण एकत्र काम करू, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले, जेव्हा संपूर्ण विश्व वातावरण बदलाच्या आव्हानाचा सामना करत आहे, तेव्हा भूतानमध्ये कार्बन उत्सर्जन कमी केले जात आहे. भूतानची याबाबत झालेली प्रगती जगाला दिशा देणारी आहे. भारताने २०४७ साली विकसित राष्ट्र म्हणून पुढे येण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे, तर भूतानने २०३४ पर्यंत उच्च उत्पन्न गटातील देश बनण्याचा संकल्प केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in