ऊर्जा क्षेत्रात ६७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत ऊर्जा सप्ताहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन

पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाबद्दल त्यांनी नमूद केले की, गेल्या १० वर्षांत ते १.५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
 ऊर्जा क्षेत्रात ६७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत ऊर्जा सप्ताहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन

पणजी : येत्या ५-६ वर्षांमध्ये भारत ऊर्जा क्षेत्रात ६७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. तसेच जागतिक गुंतवणूकदारांनी भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.

येथे भारत ऊर्जा सप्ताहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे आणि देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या वाढीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी जागतिक कंपन्यांना आमंत्रित केले. ते म्हणाले की, देशाने २०३० पर्यंत २५४ एमएमटीपीए (दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष) वरून ४५० एमएमटीपीएपर्यंत वाढ करणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, पुढील ५-६ वर्षांत भारतातील ऊर्जा क्षेत्रात ६७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. भारत ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवत आहे जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. २०४५ पर्यंत देशाची प्राथमिक ऊर्जेची मागणी दुप्पट होईल, असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, भारत हा कच्च्या तेलाचा आणि एलपीजीचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे आणि एलएनजीचा चौथा सर्वात मोठा आयातदार आहे. गेल्या दोन वर्षांत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी जागतिक समस्यांना तोंड देत देशाच्या ऊर्जा व्यवस्थापन धोरणाची आठवण करून दिली.

ते म्हणाले की सर्व तज्ञांचे मत आहे की भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सरकारी सुधारणांमुळे देशांतर्गत नैसर्गिक वायू उत्पादनाला चालना मिळण्यास मदत होत आहे आणि भारताने २०३० पर्यंत आपल्या ऊर्जा मिश्रणातील गॅसचा वाटा १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असेही ते म्हणाले.

पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाबद्दल त्यांनी नमूद केले की, गेल्या १० वर्षांत ते १.५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० टक्के होईल, असेही ते म्हणाले. जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा फक्त ४ टक्के आहे आणि २०७० पर्यंत ते निव्वळ शून्य करण्याचे लक्ष्य आहे. एक कोटी घरांवर सोलर रूफटॉप बसविण्याच्या नुकत्याच जाहीर केलेल्या योजनेतून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडशी जोडली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in