पंतप्रधान मोदी 'या' दिवशी घेणार शपथ; राजीनामा राष्ट्रपतींकडे केला सुपूर्द, १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस

शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी राष्ट्रपती भवन ५ ते ९ जूनपर्यंत अभ्यागतांसाठी बंद राहणार...
पंतप्रधान मोदी 'या' दिवशी घेणार शपथ; राजीनामा राष्ट्रपतींकडे केला सुपूर्द, १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस

लोकसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपला बहुमत मिळवता आले नसले तरी एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. येत्या ८ किंवा ९ जून रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अनेक टीव्ही रिपोर्ट्समध्ये सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. शपथ घेतल्यानंतर, सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे ते जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशातील दुसरेच नेते ठरतील.

राष्ट्रपती भवन ५ ते ९ जूनपर्यंत अभ्यागतांसाठी बंद

पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच, १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी राष्ट्रपती भवन ५ ते ९ जूनपर्यंत अभ्यागतांसाठी बंद राहणार आहे. "राष्ट्रपती भवनात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाच्या आगामी कार्यक्रमाच्या तयारीमुळे, राष्ट्रपती भवन (सर्किट-1) ची भेट ५ ते ९ जून २०२४ पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहील," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ८ किंवा ९ जून रोजीच मोदी शपथ घेतील असे सांगितले जात आहे. त्याच दिवशी नवे केंद्रीय मंत्रिमंडळही शपथ घेईल.

नायडू-नितीश यांच्याकडे सत्तेची चावी

भारतीय जनता पक्षाने - २०१४ मध्ये २८२ जागा आणि २०१९ च्या निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी त्यांना २४० जागाच जिंकता आल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा भाजपकडे ३२ जागा कमी आहेत. त्यामुळे यावेळी एनडीएच्या घटक पक्षांनी जिंकलेल्या ५३ जागांवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूसारख्या पक्षांकडे यावेळी सत्तेची चावी असण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात टीडीपीने १६ जागा तर बिहारमध्ये जेडीयूने १२ जागा जिंकल्या आहेत. आज दुपारी ४ वाजता दिल्लीत एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. यात जेडीयू प्रमुख नितीश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. यामध्ये सरकार स्थापनेबाबत आणि शपथविधीबाबत चर्चा होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in