काँग्रेसने काटचाथिवू बेट श्रीलंकेला दिले! मोदींचा काँग्रेसवर हल्ला

काँग्रेसने श्रीलंकेला सदर बेट कसे देऊन टाकले त्याची डोळ्यात अंजन घालणारी माहिती उघड झाली आहे. या प्रकारामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप आहे. आम्ही काँग्रेसवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही हे भारतीयांच्या मनात पक्के झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.
काँग्रेसने काटचाथिवू बेट श्रीलंकेला दिले! मोदींचा काँग्रेसवर हल्ला
@BJP4India

नवी दिल्ली : भारताने काटचाथिवू बेट श्रीलंकेला देऊन टाकल्याच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला. भारताने अत्यंत निष्ठुरतेने काटचाथिवू बेट श्रीलंकेला देऊन टाकल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी माध्यमांतील अहवालाचा हवाला देत सांगितले. काँग्रेसने श्रीलंकेला सदर बेट कसे देऊन टाकले त्याची डोळ्यात अंजन घालणारी माहिती उघड झाली आहे. या प्रकारामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप आहे. आम्ही काँग्रेसवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही हे भारतीयांच्या मनात पक्के झाले आहे, असे मोदी यांनी 'एक्स'वर म्हटले आहे. देशाचे ऐक्य, एकात्मता आणि हित दुर्बल करावयाचे कामच काँग्रेसने ७५ वर्षे केले, असेही मोदी म्हणाले.

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही, याबाबत प्रत्येक नागरिकाच्या मनात चिंता असल्याचे म्हटले आहे. आपल्या भूतकाळाबाबत जनतेला पूर्ण सत्य माहिती असणे महत्त्वाचे आहे. एका लेखाद्वारे ही वस्तुस्थिती समोर आली आहे, ही प्रत्येकासाठी चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

सदर बेट १९७५ पर्यंत भारताकडे होते. तामिळनाडूतील मच्छीमार तेथे पूर्वी जात असत, मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने श्रीलंकेसमवेत करार केला आणि मच्छीमारांना तेथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. द्रमुक अथवा काँग्रेसने हा प्रश्न उपस्थित केला नाही, मात्र मोदी यांची आपल्या देशाशी आणि तेथील जनतेशी बांधिलकी आहे, असे ते म्हणाले.

नेहरू, इंदिरा गांधींमुळे बेट गमावले

सदर अहवाल माहितीच्या अधिकारात मिळाला आहे. इंदिरा गांधी यांच्या सरकारने पाल्कच्या सामुद्रधुनीतील हे बेट शेजारच्या देशाकडे १९७४ मध्ये सुपूर्द केले. भारत आणि श्रीलंकेतील वादाचा मुद्दा हे बेट आहे. त्यामुळे त्यावरील दावा सोडण्यास आपली हरकत नाही, असे पं. जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

logo
marathi.freepressjournal.in