इंग्लंडच्या पंतप्रधान ट्रस यांचा राजीनामा; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर ट्रस यांच्या अडचणीत वाढ झाली
इंग्लंडच्या पंतप्रधान ट्रस यांचा राजीनामा; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

इंग्लंडच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अखेर गुरुवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. आठवडाभरापासून त्यांना पक्षांतर्गत व विरोधकांच्या प्रचंड दबावाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला. तथापि, पुढील पंतप्रधान निवडून येईपर्यंत त्या पदावर राहतील.

आर्थिक धोरणावरून वाद झाल्यानंतर ब्रिटनचे अर्थमंत्री क्वासी यांनी राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर ट्रस यांच्या अडचणीत वाढ झाली. पक्षातील व विरोधकांच्या वाढत्या दबावाला तोंड देणे ट्रस यांना कठीण जाऊ लागल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता ट्रस यांच्याजागी नवीन नेता निवडीसाठी एका आठवड्याच्या आत निवडणूक होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाने देशात नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ‘यूगव्ह’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार हुजूर पक्षातील ५३० सदस्यांपैकी ५५ टक्के लोकांनी लिझ ट्रस यांनी राजीनामा द्यावा, असे संकेत दिले होते. काही दुसऱ्या सर्वेक्षणातून देखील लिझ ट्रस यांनी राजीनामा द्यावा, असे संकेत मिळत होते. हुजूर पक्षाचे नेते देखील त्यांच्या विरोधात गेले होते.

करवाढीमुळे जनतेत नाराजी

सत्तेत येताना लिझ ट्रस यांनी करकपातीचे आश्वासन दिले होते. ट्रस यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये त्यांनी करवाढ आणि महागाई रोखण्यासाठी पावले टाकली होती.

पंतप्रधानपदासाठी पुन्हा रस्सीखेच

लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्याने आता पंतप्रधान कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पुन्हा शर्यतीत उतरण्याची शक्यता आहे. तर ट्रस यांच्याकडून पराभूत झालेले ऋषी सुनक यांचे नावही या पदासाठी आघाडीवर आहे. तसेच पेनी मॉर्डंट यांचेही नाव चर्चेत आहे.

मी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकले नाही - लिझ ट्रस

‘सध्याची परिस्थिती बघता मी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकले नाही, ज्यासाठी मी लढले होते. मी पंतप्रधान झाले तेव्हा देशात आर्थिक स्थिरता नव्हती. आम्ही कर कमी करण्याचे स्वप्न बघितले. मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याचा प्रयत्न केला, पण याची अंमलबजावणी करता आली नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. पुढच्या पंतप्रधानाची घोषणा होत नाही, तोपर्यंत मी काळजीवाहू पंतप्रधान राहीन, असे लिझ ट्रस यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in