लेपचा : संरक्षण क्षेत्रात भारत हा जागतिक स्तरावरील एक मोठा देश म्हणून उदयास येत असून भारतीय सुरक्षा दलाच्या क्षमताही सातत्याने वाढत असल्याचे सांगत, जगालाही भारताकडून असलेल्या अपेक्षा वाढत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशात लेपचा येथे केले.
भारतीय सीमेवरील या सैनिकी तळावर दिवाळीनिमित्त त्यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. त्यावेळी ते बोलत होते. सध्याच्या या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान म्हणाले की, अशा महत्त्वाच्या वेळी भारताच्या सीमांचे रक्षण करणे आणि देशात शांततेचे वातावरण असणे आवश्यक आहे आणि यामध्ये तुमची मोठी भूमिका आहे. यावेळी मोदी यांनी इंडो तिबेटी बॉर्डर पोलिसांचा वेष धारण केला होता.
ते म्हणाले की, जोपर्यंत सीमेवर माझे शूरवीर हिमालयासारखे उभे आहेत तोपर्यंत भारत संरक्षित आहे. स्वातंत्र्यानंतर या शूरवीरांनी अनेक युद्धे लढून देशाची मने जिंकली. आव्हानांना तोंड देत आपल्या जवानांनी विजय मिळविला. 'परिवार' जिथे आहे तिथे 'पर्व' असे म्हणतात. सण-उत्सवाच्यावेळी कुटुंबापासून दूर राहून सीमेवर तैनात राहणे हे कर्तव्याच्या बांधिलकीचे उदाहरण आहे. देश तुमचा ऋणी आहे. त्यामुळे दिवाळीला एक 'दीप' तुमच्या सुरक्षेसाठी असतो आणि प्रत्येक प्रार्थनेत लोक तुमच्या सुरक्षिततेची इच्छा व्यक्त करतात.
३०-३५ वर्षांत अशी एकही दिवाळी नाही जी मी तुमच्यासोबत साजरी केली नाही. जेव्हा मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नव्हतो, तेव्हा मी तुमच्यासोबत सीमाभागात दिवाळी साजरी केली, असेही मोदी म्हणाले. भारताचे सैनिक नेहमीच आपला जीव धोक्यात घालून पुढे चालले आहेत आणि त्यांनी नेहमीच हे सिद्ध केले आहे की ते सीमेवरील 'सर्वात मजबूत भिंत' आहेत. यामुळेच माझ्यासाठी जेथे आमची सुरक्षा दले तैनात आहेत त्यांचे महत्त्व मंदिरापेक्षा कमी नाही, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय सैनिकांनी भूकंप व नैसर्गिक आपत्तीत निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचेही कौतुक केले. ते म्हणाले की, जेव्हा आम्हाला सुदानमधून लोकांना बाहेर काढावे लागले तेव्हा भारताच्या शूरवीरांनी धैर्याने ती मोहीम पूर्ण केली. तुर्कस्थानात भूकंप झाला तेव्हा त्यांनी जीव धोक्यात घालून लोकांना वाचवले.जिथे जिथे भारतीयांना धोका असेल तिथे सुरक्षा दले त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच कटिबद्ध असतात, आम्हाला आमच्या सैन्याचा आणि सैनिकांचा अभिमान आहे, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
अलीकडच्या काळात ५०० पेक्षा अधिक महिला अधिकारी लष्करात कायम कमिशनवर रूजू झाल्याचेही त्यांनी सांगितले, लेपचा येथे रविवारी सकाळी ते आले आणि सैनिकांसोबत राहून, संवाद साधून, त्यांच्याबरोबर फोटोही काढून त्यांना मिठाईचे वाटप केले. 'हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी घालवणे हा खूप भावनेने आणि अभिमानाने भरलेला अनुभव होता.' ते म्हणाले, 'त्यांच्या कुटुंबांपासून दूर, आमच्या राष्ट्राचे हे रक्षक त्यांच्या समर्पणाने आमचे जीवन प्रकाशित करतात.'
नरेंद्र मोदी, पंतप्रधान