वायनाड : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या जवळपास ३५ वर्षांचा राजकीय क्षेत्राचा आपल्याला अनुभव आहे, आपले वडील राजीव गांधी यांच्यासाठी आपण १९८९ मध्ये प्रचार केला होता, असे प्रियांका म्हणाल्या.
राजीव गांधी यांच्या निवडणूक प्रचारानंतर आपण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षातील अन्य सहकाऱ्यांसाठी प्रचार केला आहे. त्यामुळे जवळपास ३५ वर्षांचा आपल्याला राजकीय अनुभव आहे, असे त्या म्हणाल्या. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कालपेटा येथे झालेल्या सभेला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. प्रियांका गांधी-वढेरा यांच्यापेक्षा जनतेचे प्रतिनिधित्व करण्याचा आपल्याला अधिक अनुभव आहे, असे हरिदास म्हणाल्या होत्या. त्यानंतर प्रियांका यांनी वरील बाब स्पष्ट केली. प्रियांका यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासमवेत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाळ हे नेतेही हजर होते.
दोन लोकप्रतिनिधींकडून वायनाडचे प्रतिनिधित्व - राहुल
वायनाड हा देशातील असा एकमेव मतदारसंघ आहे की संसदेत त्याचे प्रतिनिधित्व दोन सदस्य करणार आहेत, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे सांगितले. प्रियांका या वायनाडच्या अधिकृत लोकप्रतिनिधी असतील तर आपण अनधिकृत प्रतिनिधी असू, असे राहुल गांधी म्हणाले. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्रियांका गांधी- वढेरा निवडणुकीच्या रिंगणात पदार्पण करीत आहेत. वायनाड लोकसभा मतदारसंघात एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत लोकप्रतिनिधी असेल आणि हे दोन्ही लोकप्रतिनिधी वायनाडच्या जनतेच्या रक्षणासाठी एकत्रित काम करतील, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
रोड-शोमध्ये सहभागी होऊन प्रियांका यांची प्रचाराला सुरुवात
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात पदार्पण करून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांचे यूडीएफच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी कालपेटा येथे जोरदार स्वागत केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रियांका यांचा रोड-शो आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये राहुल गांधी यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रियांका यांचा खुल्या गाडीतून रोड-शो आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि ‘आययूएमएल’चे नेतेही सहभागी झाले होते.
कालपेटामध्ये रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्यांना प्रियांका आणि राहुल यांनी हात दाखवून अभिवादन केले. यूडीएफच्या समर्थनाचा डोक्याला पट्टा बांधलेल्या एका लहानगीला वाटेतच त्यांनी उचलून गाडीत घेतले. रोड-शोमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रियांका आणि राहुल यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या.