प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार? राहुल गांधींनी दिले संकेत

गांधी घराण्यातील सदस्यानं निवडणूक लढवावी, अशी वायनाडच्या लोकांची मागणी आहे. इथून असा उमेदवार देऊ, की तिथली जनताही खूश होईल, असं राहुल यांनी वायनाडमध्ये म्हटलं होतं.
प्रियंका गांधी
प्रियंका गांधीसंग्रहित फोटो

नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वायनाड लोकसभा पोटनिवडणूक लढवू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघामधून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवू शकतात. राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन जागांवरून निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागा त्यांनी जिंकल्या होत्या. आता नियमानुसार त्यापैकी एक जागा त्यांना सोडावी लागणार आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातूनच लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याची चर्चा असून ते वायनाडची जागा सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राहुल गांधींनी दिले संकेत-

राहुल गांधी यांनी रायबरेलीचं संसदेत प्रतिनिधित्व करावं, यासाठी उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते आग्रही आहेत. अमेठीचे काँग्रेस खासदार किशोरी लाल शर्मा यांनीही राहुल यांनी रायबरेली जागा ठेवावी, असं म्हटलं आहे. राहुल गांधींनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही ठिकाणी भेट देऊन तेथील लोकांचे आभार मानले आहेत. गांधी घराण्यातील सदस्यानं निवडणूक लढवावी, अशी वायनाडच्या लोकांची मागणी आहे. इथून असा उमेदवार देऊ, की तिथली जनताही खूश होईल, असं राहुल यांनी वायनाडमध्ये म्हटलं होतं. दिल्लीत पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक भेटीतही राहुल गांधींनी असेच संकेत दिले. प्रियंका गांधी निवडणूक लढवणार नाहीत, असं राहुल गांधींनी कुठेही स्पष्टपणे म्हटलेलं नाही. अशा स्थितीत प्रियंका गांधी वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. वायनाडमधून राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर ६ महिन्यांमध्ये पोटनिवडणूक होऊ शकते.

वायनाड सोडावं की रायबरेली? राहुल गांधीची द्विधा मनस्थिती-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड येथील एका जाहीर सभेत सांगितले की, "मला आशा आहे की, लवकरच तुमची भेट होईल. मी वायनाडचा खासदार राहायचा की रायबरेलीचा? मला आशा आहे की वायनाड आणि रायबरेली दोघेही माझा निर्णय स्वीकारतील."

राहुल गांधींना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार-

लोकसभा निवडणुकीची लढाई देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. या युद्धात द्वेषाचा प्रेमानं पराभव झाला आणि अहंकाराचा नम्रतेनं पराभव झाला. यासोबतच राहुल गांधी यांनी केंद्रातील नव्या सरकारला 'पंगू सरकार' असं संबोधलं. 2019 मध्ये देखील राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले होते. वायनाडने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय रायबरेलीच्या जनतेनेही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आता नियमानुसार राहुल गांधी दोन ठिकाणचे खासदार होऊ शकत नाहीत. त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in