पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कुणाची? प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोणीच घेत नाही, देशातील जनतेची जबाबदारी सरकारची नाही का, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता पण तसे झाले नाही. मग या हल्ल्याची जबाबदारी कोणाची, असा खडा सवाल काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी केला.
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कुणाची? प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Published on

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोणीच घेत नाही, देशातील जनतेची जबाबदारी सरकारची नाही का, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता पण तसे झाले नाही. मग या हल्ल्याची जबाबदारी कोणाची, असा खडा सवाल काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी केला.

आताचे नेतृत्व फक्त चांगल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहे. यश आणि अपयशाची जबाबदारी घेतली तर नेतृत्व घडते, कारण सत्ता हा काटेरी मुकूट आहे. देशात युद्ध सुरू होण्याआधीच संपले, हे युद्ध संपवण्याची भाषा आपले सैन्य करत नाही, सरकार करत नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. हे आपल्या पंतप्रधानांचे अपयश आहे. ११ वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार, युद्धविराम का झाला याचे उत्तर दिले जात नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ असेल तर त्याचे श्रेय घेण्याचे काम पंतप्रधान मोदी करतात, परंतु हल्ल्याची जबाबदारी कोणच घेत नाही, असे सांगत प्रियांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधला.

प्रियंका गांधी-वढेरा पुढे म्हणाल्या की, मुंबईवर जेव्हा २६/११चा हल्ला झाला तेव्हा देशाच्या गृहमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनीही राजीनामा दिला होता, कारण ती जनतेबाबतची एक जबाबदारी होती. पण आताचे नेतृत्व फक्त चांगल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहे. पहलगाममध्ये हल्ला कसा झाला, का झाला, हा प्रश्न अजूनही सतावत आहे. त्यांनी शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा उल्लेख करून म्हटले की, लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते, सरकारने त्यांना देवाच्या भरवशावर सोडले. या हल्ल्याला कोण जबाबदार आहे, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्र्यांची, गृहमंत्र्यांची नाही का, असा सवाल त्यांनी केला.

माझ्या वडिलांना दहशतवाद्यांनी मारले तेव्हा माझ्या आईने अश्रू ढाळले, तेव्हा ती ४६ वर्षांची होती. आज मी या सभागृहात ‘त्या’ २६ कुटुंबांच्या वेदनांबद्दल बोलू शकते, त्यामागील वेदना तीच वेदना आहे, जी मी सहन केली आहे. जर ‘ऑपरेशन सिंदूर’ दहशतवाद संपवण्यासाठी असेल, तर पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आल्याने मोठा धक्का बसला हे कोणाचे अपयश आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आज येथे बसलेल्या सर्व लोकांना सुरक्षा आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात मारल्या गेलेल्या २६ लोकांपैकी २५ जण भारतीय होते. तुम्ही कितीही ऑपरेशन केले तरी तुम्ही त्यांना कोणतीही सुरक्षा दिली नाही ही वस्तुस्थिती लपू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, पहलगाममध्ये जो हल्ला झाला तिथे पर्यटकांना ‘राम भरोसे’ सोडण्याचे काम सरकारने केले. देशातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे, देशातील पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांची ही जबाबदारी नाही का? पहलगाम हल्ल्याच्या २ आठवड्याआधी गृहमंत्री सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी काश्मीरला गेले होते. तिथे दहशतवादावर आपण विजय मिळवला, असे ते म्हणाले. मात्र, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कुणीच घेत नाही. ‘टीआरएफ’ दहशतवादी संघटनेने २०२० ते २०२५ या काळात २५ दहशतवादी हल्ले केले. २०२३ मध्ये या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले. भारतावर असा भयानक हल्ला होणार आहे याची सरकारला माहिती नाही. आपल्याकडे अशी कुठलीही यंत्रणा नाही का, हे आपल्या संस्थांचे अपयश आहे की नाही, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

मी वर्तमानाबद्दल बोलेन!

तुम्ही इतिहासाबद्दल बोला, मी वर्तमानाबद्दल बोलेन. तुम्ही ११ वर्षे सत्तेत आहात. काल मी पाहत होते की, गौरव गोगोई जबाबदारीबद्दल बोलत असताना, राजनाथ सिंह मान हलवत होते, पण गृहमंत्री हसत होते. त्यांनी काल सांगितले की, मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सरकारने काहीही केले नाही. पण तुम्हाला माहिती पाहिजे की, तेव्हा तीन दहशतवादी मारले गेले आणि एक वाचला ज्याला नंतर पकडण्यात आले आणि नंतर फाशी देण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांनी त्यावेळी राजीनामा दिला. राजनाथ सिंह उरी-पुलवामाच्या वेळी गृहमंत्री होते, आज ते संरक्षण मंत्री आहेत. अमित शहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत ते का? देशाला हे जाणून घ्यायचे आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

जबाबदारीही घेतली नाही!

पहलगाम हल्ला झाला तेव्हा सर्वजण एकत्र उभे राहिले. जर ते पुन्हा घडले तर आपण पुन्हा एकत्र उभे राहू. जर देशावर हल्ला झाला तर आपण सर्व जण सरकारसोबत उभे राहू. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सैन्याने शौर्याने लढा दिला, पण पंतप्रधानांना त्याचे श्रेय हवे आहे. ते बरोबर आहे, त्यांनी त्याचे श्रेय घेतले पाहिजे. पण केवळ श्रेय घेऊन नेतृत्व घडत नसते तर यश आणि अपयशाची जबाबदी घ्यावी लागते. गांधी म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर लष्करप्रमुखांनी, गुप्तचर प्रमुखांनी राजीनामा दिला का, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का, राजीनामा तर सोडाच, त्यांनी जबाबदारीही घेतली नाही. तुम्ही इतिहासाबद्दल बोलला, मी वर्तमानाबद्दल बोलेन. तुम्ही ११ वर्षे सत्तेत आहात, जबाबदारी घ्यायला हवी.

logo
marathi.freepressjournal.in