नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ देशाच्या कणाकणात असताना या विषयावर चर्चा करण्याची गरजच काय होती, असा सवाल काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी लोकसभेत केला. पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आयोजित केल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, ‘वंदे मातरम’ हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान आणि वेदनेची आठवण करून देणारे गीत आहे. ‘वंदे मातरम’चा उच्चार केला की स्वातंत्र्यलढ्याचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो. ‘वंदे मातरम’ १५० वर्षांपासून आपल्या देशाचा भाग आहे. मग आज या चर्चेची गरज काय आहे, यामागे सरकारचा हेतू काय आहे?
सरकारवर आरोप करत प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, या चर्चेमागे दोन कारणे आहेत. पहिले- पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि दुसरे- इतिहासात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्यावर नवे आरोप लादण्याचा प्रयत्न. हे सरकार भविष्याकडे पाहत नाही. लोकांच्या खऱ्या समस्यांपासून लक्ष विचलित करणे हाच त्यांचा उद्देश असतो.
नेहरुंच्या भूमिकेची आठवण
प्रियांका गांधी यांनी पंडीतजवाहरलाल नेहरुंच्या योगदानाचा उल्लेख करत सरकारवर टोला लगावला. त्या म्हणाल्या, जर नेहरुंनी ‘इस्रो’ उभारले नसते, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? सरकारने एकदा नेहरुंवर चर्चा करायला हवी. ‘वंदे मातरम’वरील चर्चेतून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, प्रदूषण या गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता सरकार अनावश्यक चर्चा करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये!
मोदींवर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले.