जयपूर : जे धर्म किंवा जातीच्या नावावर मते मागतात ते त्यांच्या कामाच्या आधारे मते मागू शकत नाहीत, असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीका करताना सांगितले. राजस्थानच्या अजमेरमधील केकडी येथे एका निवडणूक प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
लोकांनी वेगवेगळ्या पक्षांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करून मतदान करावे, असे सांगत राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष संघटित असून भाजप वेगवेगळ्या गटात फुटलेला असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
भाजपने राज्यातील आपल्या नेत्यांना बाजूला केले आहे आणि नवीन कोणाचा तरी शोध घेत असल्याचा दावा त्यांनी केला, तर बड्या उद्योगपतींना फायदा करून देण्याचे भाजपचे धोरण आहे. यात गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार होत नाही, असेही प्रियंका गांधी यांनी सभेमध्ये बोलताना सांगितले. राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्या जातील, असेही प्रियंका गांधी यांनी उपस्थितांना सांगितले.