‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत कारवाई सुरु; सहा दलालांना रेल्वे पोलीसांनी केली अटक

रेल्वे तिकीट काउंटर किंवा ऑनलाइन तिकीट काढायला गेल्यास तिकीट सहजासहजी मिळत नाही
 ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत कारवाई सुरु; सहा दलालांना रेल्वे पोलीसांनी केली अटक

सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळण्याची मारामारी होत असतानाच अवैध सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वेच्या तब्बल २८ कोटी रुपयांच्या तिकिटांची चढ्या दराने विक्री केली आहे. याप्रकरणी सहा दलालांना रेल्वे पोलीस दलाने अटक केली आहे. ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत मुंबई, दिल्ली, गुजरात येथे ही कारवाई करण्यात आली.

रेल्वे तिकीट काउंटर किंवा ऑनलाइन तिकीट काढायला गेल्यास तिकीट सहजासहजी मिळत नाही; मात्र हे दलाल तिकिटे आरक्षित करून गरजू प्रवाशांना चढ्या दराने त्याची विक्री करत होते. आरक्षणासाठी हे दलाल बनावट सॉफ्टवेअरचा वापर करत होते.

राजकोट येथे मन्नन वाघेला याला ८ मे रोजी अटक केली. त्याने दिलेल्या कबुली जबाबानंतर मुंबईतील कन्हैया गिरीला अटक झाली. हा गिरी ‘कोविड एक्स’, ‘ब्लॅक टायगर’ अशी बनावट सॉफ्टवेअर विकत होता. गिरीच्या चौकशीत वापीतील अभिषेक शर्मा याचे नाव पुढे आले. शर्मा हा बनावट सॉफ्टवेअर बनवत होता. याच्या चौकशीत अमन कुमार, अभिषेक तिवारी व विजेंद्र गुप्ता यांची नावे उघड झाली.

या दलालांकडून १,६८८ तिकिटे जप्त केली असून, त्याचे मूल्य ४३,४३,७५० रुपये आहे. तर या दलालांनी आतापर्यंत २८.१४ कोटींची बनावट तिकीटविक्री केली. यासाठी त्यांना मोठे कमिशन मिळत होते. हे आरोपी अवैध सॉफ्टवेअर बनवून ते व्हॉट्स‌अॅप, टेलिग्रामवरून विकत होते. बनावट नावे व मोबाइल नंबर टाकून ते आयआरसीटीसीचे बनावट आयडी बनवत होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ते बनावट आयपी अॅड्रेस बनवत होते. तसेच ओटीपी व्हेरिफिकेशनही त्यातून होत होते. आरोपींची कार्यपद्धती पाहता त्यांच्याकडून यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. तसेच हे प्रकार घडू नयेत, म्हणून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आरपीएफने सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in