प्रा. साईबाबा यांची कारागृहातून सुटका; म्हणाले - जिवंत बाहेर आलो हे आश्चर्यच

कारागृहात अत्यंत क्रूर जीवनाचा अनुभव घेतला, त्यामुळे तेथून आपण जिवंत बाहेर पडलो हेच आश्चर्य आहे
प्रा. साईबाबा यांची कारागृहातून सुटका; म्हणाले - जिवंत बाहेर आलो हे आश्चर्यच

नागपूर : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या खटल्यातून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांना गुरुवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयाने त्यांना दोषी ठरविल्यानंतर २०१७ पासून प्रा. साईबाबा हे कारागृहात होते.

आपली प्रकृती ठीक नाही, आपल्याला बोलताही येत नाही. त्यामुळे प्रथम आपल्याला उपचार घ्यावे लागतील आणि त्यानंतरच आपण बोलू शकतो, असे चाकांच्या खुर्चीवरून कारागृहाबाहेर आलेल्या प्रा. साईबाबा यांनी वार्ताहरांना सांगितले. कारागृहाबाहेर त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांची प्रतीक्षा करीत होते.

माओवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपाबद्दल प्रा. साईबाबा यांना ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरविली. सरकारी पक्ष त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यास असमर्थ ठरल्याचे कारण खंडपीठाने दिले. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्यान्वये त्यांना ठोठावण्यात आलेली शिक्षाही खंडपीठाने रद्द केली.

जिवंत बाहेर आलो हे आश्चर्यच - साईबाबा

कारागृहात अत्यंत क्रूर जीवनाचा अनुभव घेतला, त्यामुळे तेथून आपण जिवंत बाहेर पडलो हेच आश्चर्य आहे, असे सुटका झाल्यानंतर प्रा. जी. एन. साईबाबा यांनी येथे सांगितले. देशाच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागातील आदिवासींच्या हक्कांसाठी काम केल्याने आपल्याला लक्ष्य करण्यात आले आणि झालेली अटक ही पश्चातबुद्धी होती, कारागृहातून आपण जिवंत बाहेर पडू ही आशाच मावळली होती, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in