सुप्रीम कोर्टात वेश्या, रखेल शब्दांना बंदी

नवीन मार्गदर्शक पुस्तिका जारी
सुप्रीम कोर्टात वेश्या, रखेल शब्दांना बंदी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नवीन मार्गदर्शक पुस्तिका जारी केली असून त्यात महिलांविषयी अवमानकारक शब्द वापरण्यास बंदी केली आहे. त्याऐवजी पर्यायी शब्दांची यादी या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

द हँडबुक ऑन कॉम्बॅटिंग जेंडर स्टिरिओटाइप्स असे या पुस्तिकेचे नाव असून त्या माध्यमातून न्यायाधीश, वकील आणि अन्य संबंधितांना महिलांबाबत ठोकळेबाज शब्द, पूर्वग्रह किंवा संकल्पना न वापरण्याबाबत जागृत करण्याचा हेतू आहे. यातून न्यायालयीन कामकाजात यापूर्वी वापरलेल्या शब्दांवर शंका घेण्याचा उद्देश नसून केवळ अजाणतेपणी महिलांबाबत चुकीचे शब्द कसे वापरले जाऊ शकतात, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, असे या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले आहे. तीस पानांच्या या पुस्तिकेत अशा शब्दांची आणि त्यांच्याऐवजी वापरण्याच्या प्रतिशब्दांची यादीच प्रसिद्ध केली आहे.

त्यामुळे आता ईव्ह-टीझिंग, प्रॉस्टिट्यूट, हाऊसवाइफ असे शब्द न्यायालयीन कामकाजातून हद्दपार होणार आहेत. त्याऐवजी स्ट्रीट सेक्शुअल हॅरॅसमेंट, सेक्स वर्कर आणि होममेकर असे शब्द वापरण्याची सूचना पुस्तिकेत केली आहे. महिलांना अवमानकारक वाटू शकतील, असे शब्द आता टाळण्यात येतील. तसेच महिलांविषयीचे पूर्वग्रह कमी करून त्यांच्याबाबत अधिक संवेदनशील भूमिका घेण्यास मदत होणार आहे.

जुना शब्द पर्यायी शब्द

अफेअर विवाहबाह्य संबंध

प्रॉस्टिट्यूट/हुकर (पतुरिया) सेक्स वर्कर

अनवेड मदर (बिनलग्नाची आई) आई

चाइल्ड प्रॉस्टिट्यूट तस्करी करून आणलेले मूल

बास्टर्ड असे मूल ज्या आईवडिलांनी लग्न केलेले नाही

ईव्ह टीजिंग स्ट्रीट सेक्शुअल हरॅसमेंट

प्रोवोकेटिव्ह क्लोदिंग/ड्रेस (उत्तेजक कपडे) क्लोदिंग/ड्रेस

एफेमिनेट (जनाना) याएवेजी जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर

गुड वाइफ वाइफ (पत्नी)

कॉन्क्युबाइन/कीप (रखेल) अशी महिला जिचे लग्नाशिवाय इतर पुरुषांशी संबंध असतील.

logo
marathi.freepressjournal.in