पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदाची लॉटरी; पहिल्याच टर्ममध्ये घेणार मंत्रिपदाची शपथ

मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याबाबत कळवण्यात आलं असून आज ते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना कोणतं खातं मिळणार?...
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदाची लॉटरी; पहिल्याच टर्ममध्ये घेणार मंत्रिपदाची शपथ
Published on

पुणे: नुकताच लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला. भाजपप्रणित एनडीए आघाडीनं २९३ जागांवर तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. मोदींसोबतच एकूण ६३ नवनिर्वाचित खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनासुद्धा मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याबाबत कळवण्यात आलं असून आज ते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना कोणतं खातं मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय मत्रीपदाची लॉटरी-

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव करून मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यातून खासदार झाले आहेत. राज्यभरात भाजपला अपेक्षित यश मिळालं नसताना मुरलीधर मोहोळ यांनी मात्र पुणे मतदारसंघात विजय मिळवला. त्यांनंतर आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने मोहोळ यांना लॉटरीच लागल्याचं बोललं जात आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा १२३०३८ मतांनी पराभव केला. मुरलीधर मोहोळ यांना ५८४७२८ तर रविंद्र धंगेकर यांना ४६१६९० मतं मिळाली. वंचितकडून निवडणूक लढवणारे वसंत मोरे ३२०१२ मतं मिळवून तिसऱ्या स्थानी राहिले.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम केलं. भाजपमध्ये त्यांनी बूथ प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली. नंतरच्या काळात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. मोहोळ हे गेल्या ३० वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहेत. पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी काम केलं. पश्चिम महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवण्यासाठी आणि मराठा समाजातील नेत्याला संधी देण्याच्या भूमिकेतून भाजपने मोहोळ यांना केंद्रात घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in