

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राज्यातील सहा राज्यसभा खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.
२४ एप्रिल रोजी आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला होता. पक्षाच्या १० राज्यसभा खासदारांपैकी राघव चढ्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत साहनी आणि स्वाती मालीवाल या सात खासदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. या खासदारांनी, पक्षाने आपली तत्त्वे, मूल्ये आणि मूळ विचारसरणी सोडल्याचा आरोप केला. या सात खासदारांपैकी सहा खासदार पंजाबमधील होते.
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर मान म्हणाले की, आम आदमी पक्षाची (आप) साथ सोडणारे हे सहा राज्यसभा खासदार पंजाबमधील पक्षाच्या आमदारांनी ‘निवडले’ होते. निवडणे आणि थेट जनतेकडून निवडून येणे यामध्ये मोठा फरक आहे. हे खासदार पंजाबच्या जनतेने निवडून दिलेल्या आमदारांद्वारे निवडले गेले होते. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना पंजाबमधील सर्व ‘आप’ आमदारांच्या स्वाक्षरीची कागदपत्रे सादर केली, ज्यामध्ये या सहा खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एक्सवरील प्रतिक्रिया
मुर्मू यांच्या भेटीपूर्वी, मुख्यमंत्र्यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले होते. ‘पंजाबचे हक्क आणि हितरक्षणासाठी आमचा लढा अविरत सुरू आहे. आज आम्ही पंजाबचे ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी आणि राज्याचा बुलंद आवाज राष्ट्रपतींसमोर सादर करण्यासाठी सर्व ‘आप’ आमदारांसह निघालो आहोत.’