“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल

पंजाबमधील महापुराबाबत पत्रकाराने विचारलेला प्रश्न ऐकल्यानंतर एका व्यक्तीचा तोडक्या-मोडक्या इंग्रजीमध्ये विचित्र आणि तितकाच हसून लोटपोट करणारा प्रतिसाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतः खूप मोठा जाणकार असल्याच्या अविर्भावात हा पठ्ठ्या फाडफाड इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो खरा पण...
“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल
छाया सौजन्य - एक्स (@Gagan4344)
Published on

पंजाबमधील महापुराबाबत पत्रकाराने विचारलेला प्रश्न ऐकल्यानंतर एका व्यक्तीचा तोडक्या-मोडक्या इंग्रजीमध्ये विचित्र आणि तितकाच हसून लोटपोट करणारा प्रतिसाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तोडकं-मोडकं इंग्रजी बोलणाऱ्या या व्यक्तीने महापुराला चीनची “निर्मिती” असल्याचे सांगितले आणि त्यासाठी जपान व रशियालाही जबाबदार धरले. एवढ्यावरच न थांबता एका टप्प्यावर त्याने महापूराच्या परिस्थितीला थेट 'जागतिक युद्ध' असेही संबोधले. स्वतः खूप मोठा जाणकार असल्याच्या अविर्भावात हा पठ्ठ्या फाडफाड इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो खरा पण, त्याच्या इंग्रजीतील एकाही वाक्याचा अर्थच लागत नसल्यामुळे नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन झालंय. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या इंग्रजीशी तुलना करीत नेटकरी मजा घेत आहेत. थरूर त्यांच्या अद्भुत इंग्रजी शब्दसंग्रहासाठी ओळखले जातात. ते अनेकदा असे शब्द वापरतात की त्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी लोकांना शब्दकोश उघडावा लागतो. त्यामुळे “शशी थरूर यांना आता स्पर्धक मिळाला,” अशा आशयाच्या मजेशीर पोस्ट नेटकरी करीत असून त्याच्या उत्तरावर आणि स्पष्टीकरणावर खळखळून हसत आहेत.

दरम्यान, पंजाब राज्यातील सर्व २३ जिल्ह्यांतील १४०० हून अधिक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. पूरपरिस्थितीमुळे पंजाब सरकारने संपूर्ण राज्य आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यासह सर्व शैक्षणिक संस्था ७ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in