

होशियारपूर : प्रजासत्ताक दिनापूर्वी पंजाब पोलिसांनी एक मोठा दहशतवादी कट उधळला आहे. होशियारपूरमध्ये पोलिसांनी पाकिस्तानच्या 'आयएसआय' समर्थित प्रतिबंधित संघटना 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' शी (बीकेआय) संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे २.५ किलो आरडीएक्सने भरलेले आयईडी जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची दिलजोतसिंग, हरमनसिंग नावे उर्फ हॅरी, अजय उर्फ माहिरा आणि अर्शदीपसिंग उर्फ अर्श कंडोला अशी आहेत. हे सर्वजण एसबीएसनगर जिल्ह्यातील राहों भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून स्फोटकांव्यतिरिक्त दोन पिस्तुलेही जप्त केली आहेत. हे मॉड्यूल अमेरिकेत बसलेल्या 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' च्या हँडलर्सद्वारे चालवले जात होते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमांना लक्ष्य करून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी या आयईडीचा वापर केला जाणार होता.
अमेरिकेतून निर्देश
'बीकेआय'चे हँडलर अमेरिकेत बसून या दहशतवाद्यांना सूचना देत होते, तर पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' त्यांना स्फोटके पुरवत होती. पंजाबमधील शांतता भंग करणे आणि 'टार्गेटेड किलिंग' करण्यासाठी ही टोळी तयार करण्यात आली होती. पोलीस सध्या या चारही दहशतवाद्यांची कसून चौकशी करत असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. होशियारपूर पोलिसांनी सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे होशियारपूर पोलीस आणि सीआय जालंधरच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
पंजाबमध्ये रेल्वे मार्गावर स्फोट
प्रजासत्ताकदिनाच्या दोन दिवस आधी पंजाबमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. रेल्वे मार्गावर झालेल्या या स्फोटामुळे रेल्वेचालक गंभीर जखमी झाला आहे. हा स्फोट रेल्वे लाइनवर करण्यात आला. त्यामुळे दहशतवाद्यांचा रेल्वे लाइन उडवण्याचा कट समोर आला आहे. या स्फोटामुळे मालगाडीचे इंजिन खराब झाले आहे. हा स्फोट खानपूरजवळ रेल्वे लाइनवर झाला. ज्यावेळी स्फोट झाला, त्याचवेळी तेथून एक मालगाडी जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसजसे मालगाडीचे इंजिन खानपूर फाटकाजवळ पोहोचले, तसतसे अचानक जोरदार स्फोट व्हायला सुरुवात झाली. स्फोटामुळे रेल्वे लाइनचा सुमारे १२ फूट भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.