रुग्णालयातून औषध खरेदी सक्तीची नाही ; रुग्ण व नातेवाईकांना एफडीएचा दिलासा

रुग्णांच्या नातेवाइकांना नाईलाजास्तव अधिक पैसे देऊन औषध खरेदी करावी लागत असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले
रुग्णालयातून औषध खरेदी सक्तीची नाही ; रुग्ण व नातेवाईकांना एफडीएचा दिलासा

उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना लागणारी औषधे रुग्णालयातून खरेदी करणे यापुढे सक्तीचे नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. एफडीएच्या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयासह राज्य सरकारच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना बाहेर औषध आणण्यास सांगितले जाते, अशा तक्रारी नेहमीच होत असतात. तर रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या मेडिकल स्टोअर्समधून औषध खरेदी करा, असे ही सांगितले जाते. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना नाईलाजास्तव अधिक पैसे देऊन औषध खरेदी करावी लागत असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णालयातून औषध खरेदी यापुढे सक्तीचे नाही, असा आदेश एफडीएने काढल्याने रुग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतून औषध खरेदी करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचा दाखला देऊन अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कडून या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचे पत्र नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

रुग्णालयाशी सलग्न औषध दुकानातूनच औषधांची खरेदी करणे बंधनकारक नसून असा स्पष्ट उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी ताबडतोब दर्शनी भागात लावावेत.

- भिमेश मुतुला, राज्य सचिव, महाराष्ट्र रुग्णसेवस व श्रमिक कामगार संघटना

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in