तिरुपती : तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी वापरली जात असल्याच्या आरोपानंतर तिरुपती मंदिराचे सोमवारी शुद्धीकरण करण्यात आले. लाडू बनवण्यात येणाऱ्या स्वयंपाकघराला दूध, दही व गोमूत्राने शुद्ध करण्यात आले.
तिरुमला मंदिरात सोमवारी शुद्धीकरण करण्यात आले. या पूजेत भगवान वेंकटेश्वर स्वामी यांची मंत्रोच्चारात माफी मागण्यात आली. जवळपास ४ तास ही शुद्धीकरण पूजा चालली. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शांती होमम पंचगव्य करून भगवान वेंकटेश्वर स्वामी यांना प्रसन्न करण्यात आले. तसेच महाशांती होम आयोजित केला. या विधिसाठी मंदिराचे पुजारी व तिरुपती-तिरुमला देवस्थानमचे अधिकारीही सहभागी झाले.
तूप पुरवठादार कंपनीला ‘कारणे दाखवा नोटीस’
केंद्रीय आरोग्य खात्याने तूप पुरवठादार कंपनीला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. आरोग्य खात्याने चार कंपन्यांचे तुपाचे नमुने घेतले होते. त्यातील एका कंपनीचा नमुना निकृष्ट दर्जाचा ठरला. त्याच्या तुपात भेसळ आढळली. पण, सरकारने या कंपनीचे नाव उघड केले नाही.
ग्राहक संरक्षण खात्याच्या सचिव निधी खरे म्हणाल्या की, ‘एफएसएसएआय’चा अहवाल मिळाल्यानंतर ग्राहक संरक्षण खाते तुपाच्या गुणवत्तेची तपासणी करायला अतिरिक्त उपाययोजना करेल. अन्न सुरक्षाही ‘एफएसएसएआय’च्या अंतर्गत येते.