
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं यावेळी पुतिन यांनी स्पष्ट केलं. तसेच, भारतात येण्याचं निमंत्रण देखील स्वीकारलं आहे.
“रशियाचा पूर्ण पाठिंबा”
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार (MEA), या चर्चेदरम्यान पुतिन यांनी भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्याला “रशियाचा पूर्ण पाठिंबा” असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. पुतीन यांनी या भयानक हल्ल्याच्या दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर राजकीय भागीदारी आणखी मजबूत करण्यावर भर दिला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदींनी दिलं भारतात येण्याचं निमंत्रण-
याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी रशियाच्या ८०व्या विजय दिनानिमित्त पुतिन यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन यांना निमंत्रण दिलं, असेही जयस्वाल यांनी सांगितलं. पुतिन यांनी हे निमंत्रण स्वीकारलं देखील आहे. रशियन वृत्तसंस्था TASS नुसार, पुतिन यांनी भारतात येण्याचं पंतप्रधान मोदींनी दिलेलं निमंत्रण स्वीकारलं आहे. यापूर्वी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नियोजित रशिया दौरा रद्द केला होता. मोदी ९ मे रोजी रशियाच्या ८०व्या विजय दिनानिमित्त मॉस्कोमध्ये उपस्थित राहणार होते. पण आता वर्षाच्या अखेरीस पुतिन स्वतःच भारतात येणार आहेत.
चर्चेदरम्यान, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध कोणत्याही बाह्य दबावामुळे प्रभावित होणार नाहीत आणि हे संबंध सतत विकसित होत राहतील, या गोष्टीवरही दोन्ही नेत्यांनी जोर दिल्याचं समजतं.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांची निर्घृण हत्या झाली होती. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असले तरी अद्यापही दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आलेले नाही.