

नवी दिल्ली : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या गुरुवारपासूनच्या भारतभेटीने अर्थजगतातील घडामोडींनी वेग घेतला आहे. रशियाची सर्वात मोठी बँक एसबरबँक (Sberbank) आणि जेएससी फर्स्ट ही निधी मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने एक नवीन म्युच्युअल फंड-फर्स्ट इंडिया गुरुवारी सादर केला. त्याचबरोबर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि त्यांचे कॅनेडियन समकक्ष मनिंदर सिद्धू यांनी बुधवारी प्रस्तावित मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्यासाठी आराखडे, उद्दिष्टे आणि पद्धतींवर चर्चा केली. तिकडे औषध उत्पादक ल्युपिनने गुरुवारी सांगितले की त्यांनी कर्करोगाच्या रुग्णांमध्ये न्यूट्रोपेनियाच्या उपचारांसाठी सूचित केलेल्या बायोसिमिलर, आर्मलूपेगचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी अमेरिकेतील व्हॅलोरम बायोलॉजिक्ससोबत परवाना करार केला आहे.
रशियन बँकेचा भारतात नवा फंड
रशियाची सर्वात मोठी बँक एसबरबँक (Sberbank) आणि जेएससी फर्स्ट ही निधी मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने एक नवीन म्युच्युअल फंड - फर्स्ट इंडिया गुरुवारी सादर केला. तो निफ्टी५० निर्देशांकाच्या कामगिरीशी जोडलेली गुंतवणूक पर्याय देऊ करतो. यामुळे रशियन किरकोळ गुंतवणूकदारांना भारताच्या शेअर बाजाराशी थेट संपर्क साधता येईल.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवी दिल्लीच्या जवळपास २७ तासांच्या दौऱ्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. एसबरबँकचे सीईओ आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष हरमन ग्रेफ यांनी त्यांच्या भारताच्या व्यावसायिक भेटीदरम्यान नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया येथे झालेल्या एका कार्यक्रमात या फंडाच्या लाँचची घोषणा करण्यात आली, असे शेअर बाजाराने गुरुवारच्या एका निवेदनात स्पष्ट केले आहे.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची ही २३ वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद आहे. ही भेट महत्त्वपूर्णमानली जात आहे.
यंदाच्या भेटीतील प्रमुख मुद्दे
मोठे संरक्षण करार
एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीच्या सुरू असलेल्या पुरवठ्याचा आढावा
नवे सु-५७ फायटर जेट्स खरेदी करण्याबाबत भारताची उत्सुकता
२०२४-२५ मध्ये भारताची रशियाला निर्यात ४.९ अब्ज डॉलर होती, तर मागील आर्थिक वर्षात आयात ६३.८ अब्ज डॉलर होती. त्यामुळे ५९ अब्ज डॉलरचे व्यापार तूट निर्माण झाली. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य निश्चित केले आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची गेल्या चार वर्षांतली ही दुसरी भारत भेट आहे. कोविड-१९ महासाथ सुरू असल्याने २०२१ मध्ये त्यांनी केलेली भारत भेट केवळ पाच तासांच्या कालावधीत पार पडली होती.
या भेटीत पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण, ऊर्जा आणि दीर्घकालीन भागीदारीविषयी चर्चा केली होती. त्यांच्या या भेटीनंतर तीन महिन्यांनी रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणात आक्रमण केले.
‘त्या’ भेटीत नेमके काय घडले होते..?
पुतिन यांनी ६ डिसेंबर २०२१ रोजी २१ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेकरिता भारताचा दौरा केला होता. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळासोबत बैठक घेतली. दोन्ही नेत्यांनी “विशेष आणि विशेषाधिकारयुक्त सामरिक भागीदारी” कोविड काळातही सक्षम राहिल्याचे अधोरेखित केले.
दोन्ही देशांनी घेतलेला आढावा :
संरक्षण आणि सामरिक सहकार्याची सखोल समीक्षा
२+२ संवाद यंत्रणेची सुरुवात स्वागतार्ह असल्याचे मत
सैन्य-तांत्रिक सहकार्य विस्तारावर भर
इतर प्रमुख चर्चा विषय :
द्विपक्षीय गुंतवणूक वाढविणे
आयएनएसटीसी मार्ग आणि प्रस्तावित चेन्नई–व्लादिवोस्तोक सागरी मार्गाद्वारे संपर्क वाढविणे
दीर्घकालीन विकासाच्या नव्या संधी निर्माण करणे
अफगाणिस्तानची परिस्थिती, महामारीनंतरचा आर्थिक पुनरुज्जीवन मार्ग
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देशांच्या भूमिकांतील सामायिकता
दोन अब्ज डॉलरची पाणबुडी करार :
व्यापार, ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. दौर्याच्या अखेरीस पुतिन यांनी मोदींना २०२२ मधील पुढील शिखर परिषदेकरिता रशियाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले.
नवे भू-राजकीय वास्तव
पुतिन यांची २०२१ मधील भारत भेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाइट हाऊसमध्ये पुनरागमनापूर्वीची होती. मागील तीन वर्षांत पाश्चात्य देशांनी मोठ्या प्रमाणावर भारताकडून स्वस्त रशियन तेल खरेदीकडे दुर्लक्ष केले होते.
परंतु आता ट्रम्प यांच्या भारतविषयक टीकात्मक वक्तव्यांमुळे आणि अमेरिकेने लावलेल्या उच्च आयात शुल्कामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव वाढल्याची चिन्हे सध्या दिसतात.