

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हल्ल्यांमुळे कतारने द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) उत्पादन थांबवले आहे. त्यामुळे भारताकडे होणारा पुरवठा विस्कळीत झाला असून देशातील महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी आवश्यक गॅस उपलब्धतेवर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातील शहरे आता ‘गॅस’वर गेली आहेत. कारण देशातील बहुतांशी शहरांना ‘पीएनजी’ वाटे घरात गॅस पुरवला जातो तर ‘सीएनजी’ हा गाड्यांसाठी वापरला जातो.
भारत आपल्या गॅस गरजांच्या मोठ्या भागासाठी कतारसोबत दीर्घकालीन एलएनजी करारांवर अवलंबून आहे. मात्र सध्या एलएनजी कार्गोचा तात्पुरता पुरवठा थांबल्याने औद्योगिक ग्राहक आणि सिटी गॅस वितरण (सीजीडी) कंपन्यांना सुमारे ४० टक्क्यांपर्यंत कपात सहन करावी लागत आहे.
काही औद्योगिक ग्राहक पर्यायी पण अधिक महाग - इंधनाकडे वळू शकतात. मात्र सीएनजी विक्री करणाऱ्या सिटी गॅस क्षेत्राने गंभीर इशारा दिला आहे.
शहर गॅस कंपन्यांनी सांगितले की, करारातील स्वस्त कतारी एलएनजीऐवजी स्पॉट मार्केटमधून दुप्पट दराने एलएनजी खरेदी करावी लागल्यास सीएनजीचा किमतीतील फायदा कमी होईल आणि ग्राहक कायमस्वरूपी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याची शक्यता आहे.
याशिवाय, कतारमधील जगातील सर्वात मोठ्या एलएनजी निर्यात प्रकल्पावर इराणी ड्रोन हल्ला झाल्यानंतर उत्पादन बंद करण्यात आले आहे. हा प्रकल्प भारतालाही गॅस पुरवत होता.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत पेट्रोनेटने कतारी पुरवठादार ‘कतारी एनर्जी’ने नोटीस पाठवली आहे. त्याचप्रमाणे कतारएनर्जीनेही प्रादेशिक संघर्षामुळे पुरवठा करता न आल्याने पेट्रोनेटला विशेष नोटीस दिली आहे.
‘इराण आणि इस्रायल यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या जहाजांना सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनीतून कतारमधील रस लफान या लोडिंग पोर्टपर्यंत पोहोचणे शक्य नाही, असे पेट्रोनेटने म्हटले आहे.
कंपनीने आपल्या ‘दिशा’, ‘राही’ आणि ‘असीम’ या एलएनजी टँकरसंदर्भात फोर्स मेज्युर जाहीर केला आहे. तसेच आपल्या ग्राहकांनाही त्यानुसार नोटीस दिली आहे. भारत दरवर्षी सुमारे २७ दशलक्ष टन एलएनजी आयात करतो, त्यापैकी सुमारे ४० टक्के पुरवठा कतारकडून होतो.
सिटी गॅस कंपन्यांनी सरकारी गॅस कंपनी ‘गेल’ला पत्र लिहून सीएनजी आणि घरगुती पाईप गॅससाठी आवश्यक गॅस उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ३ मार्चच्या पत्रात असोसिएशन ऑफ सीजीडी एंटिटीज (एसीई) ने स्वस्त गॅस पुरवठा ६० टक्क्यांवर आणणे आणि स्पॉट मार्केट पुरवठा शून्यावर मर्यादित करणे याचा क्षेत्रावर गंभीर परिणाम होईल, असा इशारा दिला आहे.
कतार एनर्जीने निवेदनात म्हटले आहे की, रस लफान इंडस्ट्रियल सिटी आणि मेसाईद इंडस्ट्रियल सिटी येथील त्यांच्या प्रकल्पांवर लष्करी हल्ले झाल्याने एलएनजी आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन थांबवले आहे. आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील लक्ष्यांवर हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून तेहरानने इस्रायल तसेच अमेरिकन सैन्य तळ असलेल्या देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर या मार्गातून जाणाऱ्या जहाजांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे वृत्त आहे. पेट्रोनेटने इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम यांच्यासह सर्व गॅस कंपन्यांना विशेष नोटीस दिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस दर दुप्पट
स्पॉट मार्केटमध्ये एलएनजीचे दर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी २५ डॉलर्सपर्यंत गेले आहेत, जे दीर्घकालीन करारांच्या दरांच्या जवळपास दुप्पट आहेत. त्यामुळे गॅस तुटवडा भरून काढण्यासाठी स्पॉट खरेदी करणे महाग ठरत असून, परिस्थितीवर कंपन्या बारकाईने लक्ष ठेवून आहेत.