नवी दिल्ली : स्वाती मालीवाल यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून यादरम्यान त्यांची चौकशी करण्याची परवानगी दिली.
केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक कुमार यांनी १३ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या अर्जावर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट गौरव गोयल यांच्यासमोर सुनावणी झाली असता पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती.
न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना, कुमार यांना औपचारिक कोठडीत घेण्यास सांगून दर २४ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले आणि तपास यंत्रणा आरोपीचा कोणताही छळ करणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. तसेच कुमार यांना पोलीस कोठडीत अर्धा तास त्यांच्या वकिलाला आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. तसेच आवश्यक औषधे पुरवण्याबाबतच्या कुमार यांच्या अर्जालाही परवानगी देण्यात आली.
केजरीवाल यांच्या निवासस्थानातील फुटेज जप्त
स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याच्या चौकशीसंदर्भात दिल्ली पोलिसांचे पथक रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचे फुटेज मिळविण्यासाठी पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे.