
महू : देशातील दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि गरीब सवर्णांना पुन्हा ‘गुलाम’ बनवले जात आहे. या लोकांना श्रम करण्यास भाग पाडले जावे किंवा आवाज उठवल्यास जेलमध्ये पाठवले जावे, हे सत्ताधारी भाजपचे २१व्या शतकातील ध्येय आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केला.
मोदी जात जनगणना करण्यास घाबरतात. ते कधीच असे करणार नाहीत, पण लोकसभा-राज्यसभेतील ५० टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडू. कोणीही आम्हाला थांबवू शकणार नाही. आम्ही आधी काँग्रेसशासित राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर कायदा करून ही भिंत पाडू, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
महू येथे आयोजित काँग्रेसच्या ‘जय भीम, जय बापू, जय संविधान’ रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी (भाजप) संविधान रद्द करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ४०० जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू, असे ते म्हणाले होते. आम्ही त्यांच्यासमोर उभे राहिलो आणि लोकसभेतील ४०० सोडा, त्यांना संविधानासमोर नतमस्तक व्हावे लागले. डोके टेकवून सभागृहात प्रवेश करावा लागला. ज्या दिवशी हे संविधान संपेल, त्या दिवशी देशातील गरिबांसाठी काहीही उरणार नाही. दलित, आदिवासी, मागासलेल्या लोकांसाठी देशात काहीही उरणार नाही. हे त्यांचे ध्येय आहे.
भाजप, संघ देशद्रोही - खर्गे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या बैठकीला संबोधित केले. आज काँग्रेसला शिव्या घालणाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी काहीही केले नाही, फक्त इंग्रजांसाठी काम केले, असे ते म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांचे कोणतेही योगदान नव्हते, अशा लोकांना माफ कराल का? या लोकांना धडा शिकवायचा असेल तर एक व्हा. भाजप आणि संघ हे देशद्रोही असून त्यांच्यापासून सावध रहा, असे आवाहनही खर्गे यांनी यावेळी केले.
कांशीराम यांच्या बहिणीने घेतली राहुल गांधींची भेट
बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) संस्थापक कांशीराम यांची बहीण स्वर्ण कौर यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील महू येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली व संविधान वाचवण्यासाठी चालवलेल्या लढाईत राहुल गांधींना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.