

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला फोन टॅप करत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केल्याने खळबळ माजली आहे. इन्स्टाग्रामवरील एका प्रश्नोत्तराच्या सत्रात राहुल गांधी यांनी मोदींना समोरासमोर चर्चेचे खुले आव्हान दिले. माझ्या फोनमध्ये पंतप्रधानांविरोधातील सर्व आरोपांचे पुरावे असून, ते माझा फोन टॅप करत असल्याचा दावा गांधी यांनी केला. मोदी यांनी आपल्यासोबत समोरासमोर चर्चा केली तर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल आणि ते पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
संसदेत चर्चा करण्याच्या भाजपच्या सूचनेबाबत विचारले असता गांधी म्हणाले की, संसदेत मला बोलू दिले जात नाही. अनेकदा माझा माईक बंद केला जातो. कृषी कायदे, चीनचा मुद्दा, जनरल नरवणे यांचे पुस्तक तसेच इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर मला मत मांडू दिले नाही. त्यामुळे मला संसदेतील लांबलचक भाषणे नको आहे, थेट समोरासमोर चर्चा हवी आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला मी असे स्वरूप असावे, असे गांधी म्हणाले. या चर्चेसाठी गौतम अदानी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना परीक्षक म्हणून नेमले तरी माझी हरकत नाही, असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
मोदींवर दबाव
समाजमाध्यमावर एक व्हिडीओ शेअर करत गांधी यांनी मोदींवर दबाव असल्याचा दावा केला. मोदी आता माझ्यावर थेट टीका करत नाहीत कारण त्यांच्या मनात भीती आहे, असे ते म्हणाले. दिवाळी मीलन कार्यक्रमातही पंतप्रधानांना टेलिप्रॉम्प्टरची गरज लागली. चर्चेसाठी येतानाही तुम्ही टेलिप्रॉम्प्टर आणि आवडीचा परीक्षक आणा, असे आव्हान त्यांनी दिले. फक्त पाच मिनिटांच्या चर्चेत खरा देशद्रोही कोण आणि परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली कोण आहे हे मी सिद्ध करेन, असेही राहुल म्हणाले.
राहुल गांधींना खोटे बोलण्याची सवय - भाजप
राहुल गांधी यांनी केलेल्या 'फोन टॅपिंग'च्या आरोपावरून भाजपने शुक्रवारी त्यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे प्रवक्ते तुहिन सिन्हा म्हणाले की, राहुल गांधी 'हिट-अँड-रन' (आरोप करायचे आणि पळून जायचे) राजकारणावर विश्वास ठेवतात. ते दर काही दिवसांनी नवे आरोप करतात आणि ते सिद्ध करण्याची तसदी घेत नाहीत, त्यांना खोटे बोलण्याची सवयच आहे.
संसद अधिवेशनाबाबत विरोधकच अनभिज्ञ - प्रियांका
वायनाड: प्रस्तावित सीमांकन विधेयकाला मंजुरी देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींबाबत विरोधी पक्षांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असा दावा काँग्रेस खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी शुक्रवारी केला. विशेष अधिवेशनाबाबत सरकारकडून आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही, त्यामुळे अधिवेशन होणार असेल तर मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. तसेच देशात विरोधी पक्षांच्या वतीने केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांवर भाष्य करताना, मतभेद व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचा आवाज जाणीवपूर्वक दाबला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
गेल्या काही महिन्यांपासून आपले मत मांडणाऱ्या किंवा विरोध दर्शवणाऱ्या व्यक्तींना पद्धतशीरपणे खचवून त्यांचे तोंड बंद केले जात असल्याचे चित्र आपण पाहत आहोत, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी आपण लढा देत आहोत, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. भाजप सरकारकडून देशातील संविधान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणाऱ्या सर्व संस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.