
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकात गैरप्रकार केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ४० लाखांहून अधिक मते संशयाच्या भोवऱ्यात आहेत, असे राहुल गांधी म्हणाले आणि निवडणूक आयोग या याद्यांबाबत गप्प का, असा सवालही त्यांनी केला. त्यांनी यावेळी पुराव्यानिशी सादरीकरण करीत निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निवडणुकाच चोरल्याचा गंभीर आरोप केला.
राहुल गांधी यांनी गुरुवारी मतदार यादी पडताळणीतील अनियमिततेवर सादरीकरण केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकची मतदार यादी पडद्यावर दाखविताना दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर निवडणूक चोरी झाली आहे याची खात्री पटली. आयोगाने मशीन रिडेबल मतदार यादी न दिल्याने, आम्हाला खात्री पटली आहे की निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकात वेगवेगळ्या बुथच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव आहे. यादीत अनेक ठिकाणी लोकांचे फोटो नाहीत. त्याच वेळी, अनेक ठिकाणी बनावट पत्ते लिहिले गेले आहेत, असेही ते म्हणाले.
१ कोटी मतदार पाच महिन्यांमध्ये वाढले
महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक पार पडली, त्यावेळी पाच महिन्यांत इतके मतदार वाढले जे मागच्या पाच वर्षांत वाढले नव्हते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच महिन्यांत ४० लाख मतदार वाढले. ही बाब आश्चर्यकारक होती. तसेच संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान मोठ्या प्रमाणावर वाढले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आम्हाला घवघवीत यश मिळाले.
पाच मार्गांनी चोरी
मतांची चोरी पाच मार्गांनी करण्यात आली. भाजपने मतांची चोरी कशी केली हे राहुल गांधींनी सांगितले. पाच प्रकारे ही चोरी करण्यात आली आहे. डुप्लिकेट व्होटर्स म्हणजे एका मतदाराचे नाव मतदार यादीत जास्तवेळा येणे, खोटे पत्ते आणि तपशील मतदारांचे खोटे पत्ते देऊन आणि बनावट ओळख निर्माण करुन एकाच पत्त्यावर ५० ते ६० लोक राहात असल्याचे दाखवण्यात आले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी ४ ते ५ लोकच राहात होते. चुकीचे फोटो वापरण्यात आले, जे मतदार यादीत स्पष्ट दिसणार नाहीत. असे फोटो जे नीट ओळखताच येणार नाहीत. फॉर्म ६ चा दुरुपयोग करुनही मतदार याद्यांमध्ये घोळ केला गेला, असे पाच प्रकार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणले.
निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही?
निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही, आम्ही वारंवार आयोगाकडे डेटा मागितला पण तो आम्हाला देण्यात आला नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्यासही नकार दिला. देशात बनावट मतदान होत आहे. ही चोरी पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. या मतदार यादीत अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीतरी लिहिलेले आहे. मतदार यादीतील अनेक घरांचे पत्तेच बोगस आहेत. डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप जास्त आहे. तीन वेळा मतदान करणारे ११ हजार संशयास्पद लोक आहेत. हे लोक कुठून येत आहेत, एकाच पत्त्यावर ४६ मतदार आहेत, असेही ते म्हणाले.
७० वर्षीय वृद्धेचा प्रथम मतदार म्हणून उल्लेख
पत्रकार परिषदेत बोगस मतदारांच्या माहितीबरोबरच फॉर्म ६ चा दुरूपयोग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. यासाठी त्यांनी एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचे उदाहरण दिले. या महिलेच्या नावाने दोन वेळा फॉर्म ६ भरण्यात आला होता. तसेच त्यांच्या नावाने दोन वेळा मतदान झाल्याचेही राहुल गांधी यांनी दाखवून दिले. ३३,६९२ मतदारांची एका मतदारसंघात अशाप्रकारे नोंदणी झाल्याचे गांधी यांनी दाखवले. या सर्व उमेदवारांचे वय ७० ते ९५ वर्षांच्या घरात असल्याचेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे: निवडणूक आयोग
‘निवडणूक नियमांतर्गत कोणत्याही व्यक्तीने मतदार यादीच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केल्यास त्याला लेखी पुरावे द्यावे लागतात. गांधी यांनी नियम २०(३)(ब) अंतर्गत प्रतिज्ञापत्रावर सही करून संबंधित मतदारांची नावे द्यावीत. त्यामुळे आम्हाला या दाव्यांचा तपास करता येऊ शकेल.
गरज पडल्यास कायदेशीर कारवाईही करता येऊ शकेल, असे पत्र कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने राहुल गांधी यांना पाठवले आहे, तर केंद्रीय निवडणूक आयोगाने सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर राहुल यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करून तो दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले.