

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील 'सर्वसाधारण विषयांवरील' भाषणात देशाला अजिबात रस नसून, निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे (गोळीबाराचे) आदेश कोणी दिले, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केली. 'इंदिरा भवन' येथे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.
गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात संसदेत येण्याचे धैर्य दाखवलेले नाही. तसेच घडलेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत त्यांच्यात नाही. दिल्लीत विद्यार्थ्यांवर जे काही झाले, त्यावर भाष्य करणे गृहमंत्री किंवा पंतप्रधानांना महत्त्वाचे वाटत नाही, हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
गोळीबाराचे आदेश कोणाचे
संसदेत सर्वसाधारण मुद्द्यांवर भाषण देणे हा विषयच नव्हता, दिल्लीत आमच्या मुलांवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले, हे शहा यांनी स्पष्ट करायला हवे. ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि तेथे पेलेट गनचा वापर करण्यात आला. शहा यांनी स्वतः गोळीबाराचे आदेश दिले होते की नाही, याचे उत्तर द्यावे. जर त्यांनी आदेश दिले असतील तर ते दोषी आहेत, आणि जर त्यांना याबद्दल माहिती नसेल तर ते अकार्यक्षम आहेत. दोन्ही परिस्थितीत अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणाले. जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबद्दल पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय राम मंदिरातील देणग्यांच्या "चोरी"चा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
खर्गे यांचे सरकारवर ताशेरे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, विरोधी पक्षाला या मुद्द्यांवर आणि पेपर फुटीच्या विषयावर संसदेत चर्चा हवी होती. मात्र, १४-१५ दिवस सरकारने यावर काहीही भाष्य केले नाही, यावरून त्यांना चर्चाच करायची नव्हती हे स्पष्ट होते. राम मंदिराच्या देणग्यांमधील चोरीबाबत मोदींनी संसदेत निवेदन द्यावे, अशी आमची मागणी होती. पंतप्रधानांनी स्वतः या ट्रस्टची घोषणा करून तिची स्थापना केली होती. त्यांच्याच विश्वासू विश्वस्तांच्या देखरेखीखाली देणग्यांची चोरी झाली. दोषींवर कारवाई व्हावी ही आमची मागणी होती, पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले. करोडो लोकांचे राम मंदिरावर श्रद्धास्थान असूनही एवढी मोठी घटना घडल्यानंतरही पंतप्रधान मौन बाळगून आहेत, त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे खर्गे म्हणाले.