
गया : मतचोरी म्हणजे भारतमातेवरील हल्लाच असून ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यावर मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी दिला.
नवे पॅकेज
मतदार अधिकार यात्रेदरम्यान येथे घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी ज्याप्रमाणे विशेष पॅकेजबाबत बोलत असतात, त्याचप्रमाणे आयोगानेही मतदार यादी पडताळणीच्या रूपाने नवे पॅकेज आणले आहे. हा मतदान चोरीचाच नवा प्रकार आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतरही निवडणूक आयोग मला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगत आहे. मात्र सर्व देश त्यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहे.
आम्हाला आणखी थोडा वेळ द्या, प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतचोरी आम्ही उघडकीस आणू आणि तुम्हाला जनतेसमोर उभे करू, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजपचे सदस्यत्व
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावरही थेट टीका केली. मी कधीही खोटे बोलत नाही. मात्र या तीन निवडणूक आयुक्तांनी भाजपचे सदस्यत्व घेतले असून ते त्यांच्यासाठीच काम करत आहेत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही बिहारमध्ये आणि केंद्रात सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हा तिघांवर कारवाई करू. तुम्ही तिघांनी मतचोरी केली आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.
बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ देणार नाही
मतचोरीसाठी निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात भागीदारी सुरू आहे, मात्र बिहारमध्ये महाआघाडी एकाही मताची चोरी करू देणार नाही, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे दिला. घटनेने जनतेला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, असे असताना मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयुक्त जनतेकडून तो अधिकार हिरावून घेत आहे, असेही गांधी म्हणाले. राजदचे नेते तेजस्वी, आपण स्वत: आणि महाआघाडीतील अन्य नेते येथे उभे आहोत. आम्ही सांगू इच्छितो की, बिहारमधील एकाही मताची चोरी आम्ही होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांना पंतप्रधान करू - तेजस्वी यादव
राहुल गांधी 'मतदार हक्क यात्रे'निमित्त बिहारचा दौरा करत आहेत. राजद नेते तेजस्वी यादव हेही त्यांच्यासोबत या यात्रेत सहभागी आहेत. मंगळवारी त्यांची ही यात्रा नवादा येथे पोहोचली आहे. यावेळी तेजस्वी यांनी एक मोठे विधान केले आहे. तुम्ही पुढच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या महाआघाडीला मतदान करा, आम्ही राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू, असा दावा तेजस्वी यांनी केला आहे.