मोदींनी देश अमेरिकेला विकला! व्यापार करारावरून राहुल गांधी यांचा घणाघात

भारत-अमेरिका व्यापार करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला.
मोदींनी देश अमेरिकेला विकला! व्यापार करारावरून राहुल गांधी यांचा घणाघात
(संग्रहित छायाचित्र)
Published on: 

नवी दिल्ली : भारत-अमेरिका व्यापार करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला. देशातील शेतकऱ्यांच्या घामाला मोदींनी विकले आहे. त्यांनी केवळ शेतकरीच नव्हे, तर सामान्य जनता आणि देशालाही विकले आहे. मोदी घाबरलेले आहेत, कारण ज्यांनी त्यांची प्रतिमा रंगविली होती तीच आता भंग पावली आहे आणि म्हणूनच आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नाही, असा घणाघात त्यांनी केला.

भारताने अमेरिकेसोबत करार केल्यानंतर मंगळवारी विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केल्याने कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले. त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आल्यानंतर गांधी यांनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांवर टीका केली. जो व्यापार करार चार महिन्यांपासून रखडला होता, त्यामध्ये कोणताही बदल न करताच स्वाक्षरी करण्यात आली, मोदींनाही आणि आपल्यालाही ते माहिती आहे. मोदी यांनी सोमवारी सायंकाळी करारावर स्वाक्षरी केली, त्यांच्यावर खूप दबाव आहे, असे राहुल म्हणाले.

राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर आपल्याला सभागृहात बोलू न दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून निषेध नोंदविला आहे. विरोधी पक्षनेत्याला बोलू न देणे हा लोकशाहीवरील डाग आहे, असेही गांधी यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

इतिहासात प्रथमच...

मोदी यांची प्रतिमा रंगविण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तो फुगा फुटू शकतो, अशी भीती त्यांना वाटत आहे. मोदी यांना तडजोड करण्यासाठी भाग पाडले गेले, ते कोणी आणि कसे केले याचा विचार जनतेने करावा, मात्र इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलू दिले नाही, असा आरोप गांधी यांनी केला.

एपस्टिन फाइल्स

अमेरिकेत एका बड्या उद्योगपतीबाबत सुरू असलेल्या एका प्रकरणाचाही राहुल यांनी उल्लेख केला. अमेरिकेत सुरू असलेला हा खटला प्रत्यक्षामध्ये मोदींवरच आहे. एपस्टिन फाइल्समधून अद्यापही काही माहिती उघड व्हावयाची असल्याने सरकारवर दबाव आहे. दबावाची ही दोन मोठी कारणे आहेत. यावरूनच समजून घेतले पाहिजे की मोदी घाबरलेले आहेत, असेही गांधी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना राहुल यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. चीन आणि पाकिस्तानशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे वक्तव्य पुन्हा केले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेतला.

'यार' उल्लेख

दरम्यान, गदारोळ सुरू असतानाच एका सदस्याने अध्यक्षांच्या आसनाला उद्देशून ‘यार’ असे संबोधत केले, त्यावर उपाध्यक्ष तेन्नेटी संतप्त झाले. आपण काय म्हणालात, ही संसद आहे, लोकसभा आहे, तुम्ही अध्यक्षांना ‘यार’ म्हणू शकत नाही, असे त्यांनी संबंधित सदस्याला ठणकावले.

संसदेत आपल्याला का बोलू दिले जात नाही याबद्दल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर शरणागती पत्करली आहे, व्यापार करार कसा झाला आणि व्यापार करारातील संशयास्पद गोष्टींमुळे हे घडले आहे. एपस्टाइन फाइल्सवर संसदेत चर्चा व्हावयास हवी, असा हा प्रश्न आहे, मात्र त्यावर चर्चा झालेली नाही. आम्ही सभागृहात आणि बाहेरही यावर निषेध करीतच राहू, असे खासदार एडन यांनी म्हटले आहे.

फाशी जाण्यासही तयार

जनतेच्या हक्कांसाठी जे लढतात त्यांना गायब केले जाते अथवा निलंबित केले जाते, जनतेच्या प्रश्नावर सरकार बोलत नाही, राहुल यांचाही आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ उभे राहून जनहितासाठी मी फासावरही जाण्यास तयार आहे, असे खासदार प्रशांत पडोळे म्हणाले. लोकसभेतील ८ खासदारांचे निलंबनप्रकरणी आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात राहुल, प्रियांका गांधी-वढेरा आणि इतर खासदारांसह काँग्रेसच्या खासदारांनी नंतर संसदेच्या मकरद्वार येथे निदर्शने केली.

लोकसभेत आठ खासदारांचे निलंबन

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोकलाम व भारत-अमेरिका व्यापार करारावरून संसदेत सरकारला धारेवर धरले. या प्रश्नावर राहुल यांचे समर्थन करताना सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या आठ खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे. या खासदारांनी लोकसभेत कागदपत्रे भिरकावल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील प्रशांत पडोळे यांच्यासह गुरजित औजला, हिबी एडन, मणिकम टागोर, किरणकुमार रेड्डी, डीन कुरियाकोसे, अमरिंदरसिंग राजा वारिंग आणि एस. वेंकटेशन यांचा समावेश आहे. पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांच्यावर कागद भिरकावून संसदीय शिष्टाचाराचा भंग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in