

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात आरोपांची राळ उठवली आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे घोटाळा झाला, याचे मोठ्या स्क्रीनवर पुरावे दाखवत सादरीकरण केले आणि २५ लाख मतांची चोरी झाली असा आरोप केला. यावेळी त्यांनी एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवत तिचे नाव हरयाणाच्या मतदार यादीत तब्बल २२ वेळा असल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता ब्राझिलच्या त्या मॉडलने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"भारताच्या निवडणुकीत माझा फोटो?"
ब्राझिलमधील लॅरिसा नेरी या महिलेचा फोटो राहुल गांधींच्या सादरीकरणात वापरण्यात आला होता. भारतातील निवडणुकीसंबंधी प्रकरणात स्वतःचा फोटो वापरला गेल्याचे पाहून ती अचंबित झाली. व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना लॅरिसाने सांगितले की, भारतात वापरलेला तिचा फोटो जुना आहे आणि या वादाशी तिचा काहीही संबंध नाही. भारतात कधीही गेली नसून भारतीय राजकारणाशी संबंध नसल्याचंही तिने सांगितलं.
काय म्हणाली लॅरिसा नेरी?
लॅरिसाने आपल्या पोर्तुगीज भाषेतील व्हिडिओमध्ये म्हटलं - “लोकांनो, मी एक विनोद सांगते... पण तो भयंकर आहे! माझा जुना फोटो वापरला जातोय. खूप जुना फोटो आहे तो... मी त्यावेळी १८ किंवा २० वर्षांची होते. तो फोटो वापरून भारतात काही निवडणुकीसंबंधी गोष्टी केल्या जातायेत. लोकांना फसवण्यासाठी मला भारतीय दाखवलं जातंय. विश्वास बसतोय का तुम्हाला? आपण कसल्या वेड्या जगात जगतोय?” मी कोणत्या गोंधळात अडकलेय!”
पुढे तिने पत्रकार सतत फोन करत असल्याचेही सांगितले. एका पत्रकाराने तर माझ्या कामाच्या ठिकाणीही फोन करून मुलाखतीसाठी विचारलं. मी प्रतिसाद दिला नाही, तर त्याने माझं इंस्टाग्राम अकाऊंट शोधून तिथे संपर्क साधला. आता दुसऱ्या शहरात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीने जिचा या घटनेशी काहीही संबंध नाही, तिनेही मला एक स्क्रीनशॉट पाठवला... मी तो दाखवते, तुम्ही विश्वास ठेवणार नाही! असे ती म्हणाली. तसेच, मॉडेलिंग करीत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. ती एक हेअरड्रेसर असून स्वतःचं सलून चालवते.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
बुधवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. “देशात सध्या ‘ऑपरेशन सरकार चोरी’ सुरू आहे. हरयाणामध्ये ब्राझिलियन मॉडेलचे मतदार कार्ड तयार होते आणि ती मॉडेल २२ ठिकाणी मतदान करते. हरयाणामध्ये जे घडले तेच आता बिहारमध्येही घडणार आहे. बिहारमधील मतदार याद्यांमध्येही घोटाळे झाले आहेत, असे ते म्हणाले. पुढे राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवत तिचे नाव हरयाणाच्या मतदार यादीत असल्याचा आरोप केला. “ही महिला गोवा किंवा महाराष्ट्रातील नसून ब्राझीलमधील मॉडेल आहे. तिच्या नावाने हरयाणात २२ वेळा मतदान करण्यात आले. कधी स्वीटी, कधी सीमा, तर कधी सरस्वती या नावाने तिने मतदान केले. या मॉडेलचे नाव मला माहित नाही, मात्र या महिलेचा फोटो मॅथियस फरेरा याने अनस्प्लॅश डॉटकॉमवर अपलोड केलेला होता. एका ब्राझिलियन मॉडेलचे नाव हरयाणाच्या मतदार यादीत कसे आले?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.