Putin India Visit : केंद्र सरकार पुतीन यांना भेटू देत नसल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

परंपरेनुसार कोणताही विदेशी पाहुणा भारतात आल्यावर विरोधी पक्षनेत्यालाही भेटतो. पण आता सरकार त्यांना विरोधी पक्षनेत्यांची भेट न घेण्यास सांगतात. फक्त सरकारच नाही, आम्हीही देशाचे प्रतिनिधित्व करतो. मात्र, सध्याचे सरकार असुरक्षिततेच्या भावनेतून अशी भेट होऊ न देण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.
Putin India Visit : केंद्र सरकार पुतीन यांना भेटू देत नसल्याचा राहुल गांधी यांचा आरोप
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : परंपरेनुसार कोणताही विदेशी पाहुणा भारतात आल्यावर विरोधी पक्षनेत्यालाही भेटतो. पण आता सरकार त्यांना विरोधी पक्षनेत्यांची भेट न घेण्यास सांगतात. फक्त सरकारच नाही, आम्हीही देशाचे प्रतिनिधित्व करतो. मात्र, सध्याचे सरकार असुरक्षिततेच्या भावनेतून अशी भेट होऊ न देण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.

काँग्रेसने मोदी सरकारवर राजनैतिक प्रोटोकॉल धुडकावल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना सरकारवर गंभीर आरोप केले. अटलबिहारी वाजपेयींपासून ते मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत ही परंपरा पाळली जात होती, असे ते म्हणाले.

प्रोटोकॉलचा उलटा वापर

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, परंपरेनुसार परदेशी पाहुणे विरोधी पक्षनेत्याला भेटतात. पण आता याउलट होत आहे.

सरकार कोणतीही दुसरी आवाज उठू देत नाही आणि कोणत्याही भिन्न पक्षाचे मत ऐकण्यासही तयार नाही. सरकार प्रोटोकॉलचा उलटा वापर करत आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा देत सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.

रशियाचे अध्यक्ष राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. मात्र राहुल गांधी यांनी केंद्र सरकार काही संकेत आणि परंपरा पाळत नसल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकार कोणत्याही परदेशी नेत्याला विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊ देण्याची परवानगी देत नाही. हे सरकार जुने संकेत पाळत नाही, असे गांधी यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांना सांगितले.

थरूर यांचाही पाठिंबा

राहुल गांधी पुढे म्हणाले, लोकसभा विरोधी पक्षनेता हा दुसरा दृष्टिकोन देत असतो. आम्हीही भारताचे प्रतिनिधित्व करतो. मात्र सरकारला आम्ही विदेशी उच्च पदस्थांना भेटू नये असे वाटते. असुरक्षितता वाटते म्हणूनच मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय जुनी परंपरा पाळत नाही. दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले. त्यांनी लोकशाहीमध्ये इतर देशांच्या नेत्यांना कोणत्याही बाजूच्या नेत्यांना भेटण्याचे स्वातंत्र्य असावे, असे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in