कितीही ओरडा, रोजगार मिळणार नाही! राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान बुधवारी घंटाघर चौकात झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अंबानी-अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले.
कितीही ओरडा, रोजगार मिळणार नाही! राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
Published on

लखनौ : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान बुधवारी घंटाघर चौकात झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अंबानी-अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. राम मंदिराच्या कार्यक्रमाला किती दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोक उपस्थित होते? तिथे तुम्हाला अंबानी दिसले, पण दलित आणि मागासलेले लोक दिसले नसतील. तुम्हाला त्रास दिला जात आहे. ते भरती करतात पण पेपर फुटतात. कितीही ओरडा, रोजगार मिळणार नाही. नरेंद्र मोदींना मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

भारत जोडो न्याय यात्रेच्या ३९व्या दिवशी राहुल गांधी यांची यात्रा लखनौच्या बंथराहून उन्नावला पोहोचली. त्यावेळी ते म्हणाले की, “मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आलो आहे. देशातील १० मोठ्या कंपन्यांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांचा सहभाग नाही. जात जनगणनेसाठी मोठे क्रांतिकारी पाऊल उचलणे गरजेचे आहे.”

“भाजपच्या धोरणांनी तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या, उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यात जा आणि विचारा तुमचा पेपर फुटला का, उत्तर येते, हो... तरुणांनी वर्षानुवर्षे तयारी केली. पालक पैसे खर्च करतात पण पेपर फुटतो. आमचे सरकार आल्यास पेपर फुटणाऱ्यांवर अशी कारवाई करू की लोकांच्या लक्षात राहील,” असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

परराष्ट्र दौऱ्याने यात्रेला ब्रेक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा परराष्ट्र दौरा आणि पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकांमुळे ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला काही दिवस विश्रांती मिळणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी न्याय यात्रा स्थगित राहणार आहे. त्याचप्रमाणे २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात भाषण देण्यासाठी जाणार असल्याने ही यात्रा स्थगित केली आहे. तसेच याच काळात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात दिल्लीतही काँग्रेसच्या बैठका आयोजित केल्या आहेत. या बैठकांना ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर २ मार्चपासून पूर्ववतपणे ही यात्रा धौलपूर येथून सुरू होणार असल्याचे खासदार जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in