बोगोटा : लोकशाहीवर होणारा हल्ला हा भारतासाठी मोठा धोका आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारवर केली.
कोलंबियाच्या ईआयए विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात बोलताना, गांधी यांनी "संरचनात्मक दोष" या मुद्द्यावर भर दिला. अभियांत्रिकी आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात भारताजवळ मजबूत क्षमता आहे. त्यामुळे मला देशाबद्दल खूप आशावादी आहे. पण त्याचवेळी, भारताच्या संरचनेत काही दोष आहेत जे सुधारण्याची आवश्यकता आहे. सर्वात मोठे आव्हान म्हणजे भारतात लोकशाहीवर होणारा हल्ला होय, असे गांधी म्हणाले.
लोकशाही प्रणाली विविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ती विविध परंपरा, सण आणि विचारसरणी, धर्मीय श्रद्धा यांना वाढण्याची संधी देते. परंतु, भारतातील लोकशाही प्रणालीवर सध्या हल्ला होतो आहे, जो ‘मोठा धोका’ आहे, असे ते म्हणाले.
भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. खरेतर, हा देश हे सर्व लोक आणि संस्कृती यांच्यातील संवाद आहे. विविध परंपरा, धर्म आणि विचार यांना जागा देणे आवश्यक आहे आणि ही जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही प्रणाली होय, असे गांधी म्हणाले.