
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणताही नवा विचार उरलेला नाही आणि तरुणांना रोजगाराऐवजी फक्त जुमले मिळणार आहेत, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘विकसित भारत योजना’वर शुक्रवारी टीका केली.
पावसाळी अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाला विचारलेल्या लेखी प्रश्नाची प्रत आणि त्याचे उत्तर शेअर केले. ‘एक्स’वर पोस्ट करताना राहुल गांधी म्हणाले, "एक लाख कोटी रुपयांचा जुमला – सीझन २. ११ वर्षांनंतरही मोदीजींचे तेच जुने जुमले, तेच रटलेले आकडे."
गांधी म्हणाले, गेल्या वर्षी एक लाख कोटी रुपयांतून एक कोटी इंटर्नशिपचे आश्वासन देण्यात आले होते. यंदाही एक लाख कोटी रुपयांच्या रोजगार योजनेचे आश्वासन देण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, "सत्य काय? संसदेत माझ्या प्रश्नाला सरकारने मान्य केले की १० हजारांपेक्षा कमी इंटर्नशिप झाल्या. मेहनताना इतका कमी होता की ९० टक्के तरुणांनी नकार दिला." त्यांनी आरोप केला, "मोदीजींकडे आता कोणताही नवी संकल्पना नाही. या सरकारकडून तरुणांना रोजगार नाही, फक्त जुमले मिळतील, असे ते म्हणाले.