
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले असल्याचा दावा शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. इतकेच नव्हे, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले, असा सवालही गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केला.
जयशंकर यांनी डच प्रसारकाला दिलेल्या मुलाखतीची व्हिडीओ फीत टॅग करून राहुल यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी एकाही देशाने भारताला पाठिंबा का दिला नाही, भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांना कोणी सांगितले, असे सवाल गांधी यांनी केले आणि भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले असल्याचे म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या प्रतिष्ठेशी तडजोड केल्याचा आरोप गांधी यांनी गुरुवारी केला होता. पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई थांबवून देशहिताचा त्याग का केला, केवळ कॅमेऱ्यासमोरच आपले रक्त का सळसळते, असे सवालही गांधी यांनी मोदी यांना केले.