उद्योगपतींच्या कल्याणासाठी परमेश्वराने मोदींना पाठविले; राहुल गांधी यांचे टीकास्त्र

परमेश्वराने मोदींना गरीबांच्या कल्याणासाठी नव्हे, तर दोन बड्या उद्योगपतींच्या मदतीसाठी पाठविले आहे, असा टोला गांधी यांनी लगावला...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रुद्रपूर (उत्तर प्रदेश) : आपला जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. परमेश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाठविले आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी जोरदार खिल्ली उडविली. परमेश्वराने मोदींना गरीबांच्या कल्याणासाठी नव्हे, तर दोन बड्या उद्योगपतींच्या मदतीसाठी पाठविले आहे, असा टोला गांधी यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी म्हणतात की, त्यांचा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही तर परमेश्वराने त्यांना पाठविले आहे. त्यांचे म्हणणे खरे आहे. परमेश्वराने त्यांना दोन बड्या उद्योगपतींच्या मदतीसाठी पाठविले आहे. जर परमेश्वराने त्यांना खरोखरच पाठविले असते तर त्यांनी देशातील गरीबांसाठी, वंचितांसाठी काम केले असते, मात्र त्यांना परमेश्वराने दोन बड्या उद्योगपतींची मदत करण्यास सांगितले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मोदींनी कायद्याचे राज्य संपुष्टात आणल्याचा राहुल यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्याचे राज्य संपुष्टात आणले असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला. सर्वात दुर्बल व्यक्तीही अन्यायाविरोधात जोराने आवाज उठवू शकेल अशी यंत्रणा आम्ही निर्माण करू, असा दावाही गांधी यांनी केला. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात हत्या झालेल्या दलित युवकाच्या बहिणीच्या मृत्यूवरून गांधी यांनी भाजपवर हल्ला चढविला.

छळवणुकीच्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी काही अज्ञात इसमांनी आपल्या भावावर दबाव आणल्याची तक्रार एका दलित युवकाच्या बहिणीने केली होती. त्या बहिणीचा रुग्णवाहिकेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपले काका राजेंद्र अहिरवार यांचा मृतदेह घेऊन ती रुग्णवाहिकेतून जात होती. राजेंद्र यांची शनिवारी रात्री बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्याचे राज्य संपुष्टात आणले आहे. मध्य प्रदेशातील दलित कुटुंबाशी भाजपचे नेते कशा प्रकारे खेळले त्याचा विचार करून आपल्याला वेदना होतात आणि संतापही अनावर होतो. भाजपच्या राजवटीत घडलेली ही शरमेची घटना आहे. त्यामुळे दुर्बल व्यक्तीही अन्यायाविरोधात आवाज उठवू शकेल अशी यंत्रणा आपण निर्माण करू, असे आश्वासन गांधी यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in