
नवी दिल्ली : पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामाबाबत सरकारने तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. तो कमी करायला शनिवारी युद्धविराम घोषित करण्यात आला. यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले की, "संसदेचे विशेष अधिवेशन तत्काळ बोलावण्यात यावे, या विरोधकांच्या एकमताने केलेल्या आवाहनाचा मी पुनरुच्चार करतो. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम जाहीर केलेल्या युद्धविरामावर चर्चा करणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला सामूहिक संकल्प प्रदर्शित करण्याची ही एक संधी असेल. मला खात्री आहे की तुम्ही या मागणीचा गांभीर्याने विचार कराल आणि लवकरच त्यावर निर्णय घ्याल, असे त्यांनी सांगितले.