Video : "त्यांनी हिंदुत्त्वाचा अपमान केला नाही..." उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींची पाठराखण

आमच्यापैकी कुणीही हिंदुत्त्वाचा अपमान करणार नाही आणि सहनही करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Video : "त्यांनी हिंदुत्त्वाचा अपमान केला नाही..." उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींची पाठराखण

मुंबई: काल लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला धारेवर धरलं. दरम्यान हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या या भाषणाविरोधात भाजपकडून देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद काल राज्याच्या विधानपरिषदेमध्येही उमटले. दरम्यान राहुल गांधी यांच्या हिंदुत्त्वावरील विधानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी हिंदुत्त्वाचा अपमान केला नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी स्वतः राहुल गांधीचं भाषण पाहिलं आहे. हिंदुत्त्वाचा अपमान आमच्यापैकी कुणी करणारही नाही आणि कुणी सहनही करणार नाही. राहुल गांधी म्हणाले, भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाहीये. माझंही हेच ठाम मत आहे. मीही भाजपला सोडलंय, हिंदुत्त्वाला नाही."

ते पुढं म्हणाले की, "अपुऱ्या माहितीच्या आधारे तुम्ही राहुलजींच्या विरोधात निषेधाचा ठराव करू इच्छित होता. असत्य माहितीच्या आधारे असा ठराव आणणं, हासुद्धा सभागृहाचा अपमान आहे. या ठरावाची मागणी करणाऱ्या सदस्यालाही तुम्ही निलंबित करणार आहात का? लोकसभेमध्ये जय संविधान म्हटल्यानंतर काही जणांना मिरच्या झोंबल्या. त्यांचा मी निषेध करतो. आता दोन्ही सभागृहांमध्ये त्यांच्या निषेधाचा ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवावा,"

महादेवाचा फोटो का दाखवू दिला नाही?

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, "राहुल गांधी यांनी काय चुकीचं म्हटलं आहे का? महादेवाचा फोटो ते दाखवत होते तो त्यांना दाखवू दिला नाही. हेच हिंदूत्व आहे का, जय श्रीरामचा नारा पंतप्रधान सभेत सुद्धा देतात. मग संसदेत इतर कुणी म्हटलं तर हा गुन्हा आहे का?"

अंबादास दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबन-

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईतील विधानभवनात सुरु आहे. काल (१ जुलै) अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाड लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता. या प्रकरणी अंबादास दानवे यांचं सदस्यत्व पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आलं आहे. तसेच या पाच दिवसांत त्यांना सभागृहात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईचा उद्धव ठाकरे यांनी निषेध केला.

logo
marathi.freepressjournal.in