डोकलामवरून संसदेत हंगामा; मोदी सरकार मला बोलू का देत नाही? माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकावरून राहुल गांधी आक्रमक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील संदर्भ देताच लोकसभेत मोठा गदारोळ झाला.
डोकलामवरून संसदेत हंगामा; मोदी सरकार मला बोलू का देत नाही? माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकावरून राहुल गांधी आक्रमक
डोकलामवरून संसदेत हंगामा; मोदी सरकार मला बोलू का देत नाही? माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकावरून राहुल गांधी आक्रमकPhoto : X (INCIndia)
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील संदर्भ देताच लोकसभेत मोठा गदारोळ झाला. राहुल यांच्या संदर्भाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घाबरत नसेल तर मला बोलू का दिले जात नाही, असा सवाल राहुल गांधींनी केला. त्यानंतर सभागृहातील गदारोळ अधिकच वाढत गेल्याने अध्यक्षांनी कामकाज स्थगित केले.

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलत असताना नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, नरवणे यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की डोकलाममध्ये आणि भारतीय सीमेमध्ये चीनने घुसखोरी केली. नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करताच लोकसभेत गोंधळाला सुरुवात झाली. जे पुस्तक प्रकाशितच झालेले नाही ते पुस्तक तुम्ही सभागृहात कसे काय वाचता, असा प्रश्न राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला. ओम बिर्ला यांनीही, हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही तर मग ते अधिकृत कसे काय मानले जाणार, असा सवाल करून सदनाची मर्यादा तुम्ही ओलांडू नका, असे राहुल गांधींना आवाहन केले. तर हे पुस्तक १०० टक्के नरवणे यांचे आहे आणि अधिकृत आहे, असे राहुल म्हणाले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळाला. राहुल गांधी म्हणाले की , एका प्रकाशित मासिकात नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे कोट आहेत. नरवणे यांच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले, चिनी सैन्याचे टँक भारतीय सीमेजवळ आले आणि चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला. चार चिनी टँक भारतीय सीमेत प्रवेश करत होते. चिनी सैन्याचे टँक कैलास पर्वतरांगावर चढत होते.

नेमके काय घडले?

राहुल गांधींकडून जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न झाला, तर पुस्तक प्रकाशित झालेले नाही त्यामुळे संदर्भ देता येत नाही, असा आक्षेप राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जनरल नरवणे यांचे पुस्तक प्रकाशित झालेले नाही, असे सांगत आक्षेप घेतला. पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही ते राहुल यांनी सांगावे, अशी मागणी लोकसभेत करण्यात आली आणि गदारोळ झाला.

राहुल गांधी म्हणाले, मी या पुस्तकाचा उल्लेख करणार नव्हतो पण आमच्या खासदारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यामुळे मी नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. त्यानंतर माझ्या हातात एक मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये लेख आहे तो मी कोट करु इच्छितो. मोदी सरकार घाबरत नसेल तर मला बोलू का दिले जात नाही, असा सवाल राहुल गांधींनी विचारला.

राष्ट्रीय सुरक्षेवर बोलू दिले जात नाही?

दरम्यान, सभागृह तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संसद भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोप केला की, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर मला लोकसभेत बोलू दिले जात नाही. राहुल गांधी म्हणाले, मी जे सांगत आहे, ते माझे मत नाही. हे नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. मात्र त्या पुस्तकाला प्रकाशित होण्याची परवानगी दिली जात नाही. ते आजही प्रलंबित आहे. हा माजी लष्करप्रमुखांचा दृष्टिकोन आहे. मग सरकारला नेमकी भीती कशाची आहे. लोकांनी ते पुस्तक वाचले तर नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि लष्कराबाबतची सत्य परिस्थिती समजेल. मी काहीही लिहिलेले नाही, मी फक्त एका लेखाचा संदर्भ देत आहे. तरीही मला संसदेत बोलण्यापासून रोखले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

नरवणे यांचे पुस्तक चर्चेत

जनरल एम. एम. नरवणे यांचे आत्मचरित्र २०२४ मध्ये प्रसिद्ध होणार होते, मात्र यातील काही उतारे हे एका वृत्तसंस्थेने आणि इतर काही माध्यमांनी २०२३ मध्ये प्रसिद्ध केले. ॲमेझॉन आणि इतर काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी या पुस्तकाच्या प्री-ऑर्डर्सदेखील स्वीकारल्या होत्या. ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या नावाचे हे पुस्तक ‘पेंग्विन’ प्रकाशनाकडून प्रकाशित केले जाणार होते. मात्र, सरकारकडून परवानगी न मिळाल्यामुळे हे पुस्तकाचे प्रकाशन रखडल्याचे सांगितले जाते. ॲमेझॉनवर अजूनही या पुस्तकाची लिस्टिंग दिसते, मात्र ते ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध नाही.

५६ इंचाची छाती गेली कुठे?

या पुस्तकातून नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्याबाबतही माहिती मिळेल. मात्र त्याचबरोबर, देशाच्या राजकीय नेतृत्वाकडून लष्कराला कसे अपयशी ठरवण्यात आले, हेही लोकांसमोर येईल, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी पुढे म्हणाले, सरकार घाबरलेले आहे. कारण हे सर्व समोर आले, तर नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांची खरी भूमिका देशासमोर उघड होईल. चीन आमच्यासमोर उभा असताना आणि पुढे सरकत असताना, तथाकथित ‘५६ इंचाची छाती कुठे गेली होती, हा प्रश्न लोक विचारतील’, असा घणाघात त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in