
नवी दिल्ली : काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदत घेत महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगासह भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. याबाबत रविवारी पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सगळ्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. निवडणूक आयोगावर मतदार यादीवरून जे आरोप लावण्यात आलेत, ते निराधार आणि खोटे आहेत. हा देशाच्या संविधानाचा अपमान आहे. जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करावे, अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी, असे आव्हान निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना दिले आहे.
“पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेला डेटा आमचा नाही. चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करणे आणि त्यात एखाद्या महिलेने २ वेळा मतदान केल्याचे सांगणे, हे खूप गंभीर आरोप आहेत. विनाप्रतिज्ञापत्र अशा गंभीर आरोपांवर निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही. कारण ते संविधान आणि निवडणूक आयोग दोघांच्याही विरोधात होईल. आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही. सर्व राजकीय पक्ष समान आहेत. जर त्रुटी दूर करण्यासाठी अर्ज योग्य वेळी केला गेला नाही आणि नंतर मतचोरीसारखे चुकीचे शब्द वापरून जनतेची दिशाभूल केली गेली तर हा लोकशाहीचा, संविधानाचा अपमान आहे,” असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
“काही जणांनी मतचोरीचे आरोप केले, पुरावे मागितल्यावरही उत्तर मिळाले नाही. निवडणूक आयोग अशा आरोपांना घाबरत नाही. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना लक्ष्य केले जात आहे. मात्र आम्ही हे स्पष्ट करतो की, निवडणूक आयोग निर्भयपणे गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुण आणि सर्व धर्म आणि वर्गाच्या लोकांसोबत ठामपणे उभे आहे, उभे होते आणि उभे राहील,” असेही ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
“निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केल्यानंतर कायद्यात अशी तरतूद आहे की, ४५ दिवसांत राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीला आव्हान देऊ शकतात किंवा याचिका दाखल करू शकतात. मात्र, ४५ दिवसांच्या कालावधीनंतर आता अशाप्रकारचे निराधार आरोप करणे योग्य नाही. अशाप्रकारचे निराधार आरोप करण्यामागील हेतू आम्ही समजतो,” असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
आमच्यासाठी सर्व समान - निवडणूक आयोग
“भारताच्या संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला आणि १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात आले आहे. प्रत्येक राजकीय पक्षांचा जन्म निवडणूक आयोगातील नोंदणी केल्यानंतरच होतो. मग असे असताना निवडणूक आयोग सर्वच राजकीय पक्षांबरोबर भेदभाव कसा करेल? निवडणूक आयोगासाठी ना कोणी विरोधी पक्ष, ना कोणी सत्ताधारी. आमच्यासाठी सर्व पक्ष एकसमान आहेत. निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही,” असेही ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या निवडणुकीविषयी सुप्रीम कोर्टात एकही याचिका नाही
महाराष्ट्रात निवडणूक होऊन आज ८ महिने झाले, मग सर्वोच्च न्यायालयात एकही याचिका दाखल का केली नाही? शेवटच्या काही तासांत मतदान वाढले असा आरोप केला, त्यालाही निवडणूक आयोगाने उत्तर दिले. जर १० तास मतदान झाले तर प्रत्येक तासाला सरासरी १० टक्के मतदान वाढते. अखेरच्या तासांत १० टक्क्याहून कमी मतदान झाले, हे कशावरून सांगता? एखादी गोष्ट तुम्ही १० वेळा, २० वेळा सांगितली, म्हणून तेच सत्य आहे, असे होत नाही. सत्य हे सत्यच राहते. सूर्य पूर्वेलाच उगवतो, कुणाच्या सांगण्यावरून पश्चिमेला उगवत नाही, असा टोलाही निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि काँग्रेसला लगावला.
....म्हणून ‘एसआयआर’ प्रक्रियेला प्रारंभ
“गेल्या दोन दशकांपासून मतदार याद्यांमधील त्रुटी सोडवण्यासाठी मागणी करण्यात आलेली होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठी ‘एसआयआर’ प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षांना आवाहन करत आहे की, १५ दिवसांत मतदार यादीतील फेरतपासणी करण्यासंदर्भातील काही त्रुटी असतील तर सांगा. मात्र, काही राजकीय पक्षांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्यासाठीच ‘एसआयआर’ प्रक्रियेची सुरुवात करण्यात आलेली आहे. बिहारमधील ७ कोटींपेक्षा जास्त मतदार निवडणूक आयोगाच्या पाठीशी उभे आहेत,” असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक कर्मचाऱ्यांनी भाजपच्या गुन्ह्यांत सहभागी होऊ नये - अखिलेश
मतदार यादीत घोटाळे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी भाजपच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये. मतदार यादीत घोटाळे करणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते बूथ स्तरावरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांवर कठोर कारवाई होईल. त्यांना निलंबन आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. याशिवाय असे कर्मचारी आपल्या विभागात, कुटुंबात आणि समाजात देशाशी विश्वासघात करणारे म्हणून दोषी ठरतील, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.
१० हजार नावे काढण्याची ऑफर होती - बच्चू कडू
विधानसभेच्या आधी माझ्याकडे १० हजार लोकांची यादी मागितली होती. ज्यांचे मतदान तुम्हाला मिळत नाही, अशी नावे आम्ही उडवून टाकतो. आपले लोक कसे निवडून आणायचे, ते आम्हाला माहीत आहे. तुम्हाला मत न मिळणाऱ्या लोकांची नावे यादीतून काढून, तुम्हाला मते मिळतील अशी १० हजार नावे आम्ही टाकू, अशी ऑफर त्यांनी दिली होती. वेळ आली तर त्याचे पुरावे मी देईन, असा गौप्यस्फोट प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला.
महाराष्ट्रात जादूने एक कोटी नवीन मतदार निर्माण केले -राहुल गांधी
देशात संघ आणि भाजप संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे जिथे निवडणुका होतात, तिथे त्यांचा विजय होतो. आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यावर आढळले की, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने १ कोटी मतदार निर्माण केले. जिथे नवीन मतदार आले, तिथे भाजप युती जिंकली, अशी टीका राहुल गांधी यांनी बिहारमधील ‘मतदार हक्क यात्रे’दरम्यान निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर केली.