
मुंबई : महाराष्ट्रात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप करणारा लेख काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी अनेक वर्तमानपत्रांमध्ये लिहिला. या लेखामुळे राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी महायुती आणि राज्यातील काँग्रेसमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
शनिवारी सकाळी हा लेख प्रसारमाध्यमांत छापून आल्यानंतर, राहुल गांधी यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमुळे कथित निवडणूक गैरप्रकारावर वाद निर्माण झाला.
राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पक्षाचे राज्यप्रभारी रमेश चेन्निथला आणि इतर नेत्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दिला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, जेव्हापर्यंत ते पराभवाच्या छायेतून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्ष वाढणार नाही. काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमधील चांगल्या कामगिरीनंतर अती आत्मविश्वास दाखवला आणि घराघरात संपर्क व जनसंपर्काच्या मूलभूत गोष्टी विसरल्या.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्यप्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकशाहीचा खून झाला आहे. राहुल गांधींनी निर्विवाद तथ्ये आणि स्पष्ट भूमिकेच्या आधारे एक थरारक सत्य समोर आणले आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल कपट, फसवणूक आणि लोकशाही संस्थांवर संगठित हल्ल्यामुळे अपहृत झाला, असा दावा त्यांनी निवेदनात केला.
गांधी यांचे म्हणणे हास्यास्पद
यानंतर राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने ते हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला पाठवलेल्या उत्तरात सर्व तथ्ये मांडली आहेत. ही माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. असे मुद्दे वारंवार उपस्थित करून या सर्व तथ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
उत्तरास टाळाटाळ नको - राहुल
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या लेखाला भारतीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. पण या उत्तरावरही राहुल गांधींनी आक्षेप घेतला आहे. उत्तर द्यायला टाळाटाळ करू नका, उत्तर देण्याची ही पद्धत नाही. तुम्ही एक संवैधानिक संस्था आहात. जर तुमच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तरे द्या आणि ते सिद्ध करून दाखवा.
१२ जूनला मशाल मोर्चा - सपकाळ
दरम्यान, विधानसभा निवडणुकांमधील ‘मतचोरीच्या’ नमुन्याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस १२ जून रोजी संपूर्ण राज्यात मशाल मोर्चाचे आयोजन करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी सांगितले की, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. जनजागृतीसाठी काँग्रेस पार्टी मशाल मोर्चा काढणार आहे.
हा तर महाराष्ट्राचा अपमान - फडणवीस
राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गांधी हे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान करत आहेत. गांधींनी केलेल्या दाव्यांमुळे काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये होणाऱ्या पराभवाची कबुली दिली आहे. गांधी यांनी अज्ञानातून जागे व्हावे आणि काँग्रेसच्या अंधाऱ्या भवितव्याची जाणीव ठेवावी.
गिरे तो भी टांग उपर - शिंदे
विधानसभा निवडणुकीत मविआ झालेला पराभव म्हणजे गिरे तो भी टांग उपर असाच प्रकार आहे. देशात ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करत आहेत, आपले मत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उरलासुरला जनादेशही गमावून बसेल, असेही ते म्हणाले.