
आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) कडाडून टीका केली. तसेच त्यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधींवरदेखील (Rahul Gandhi) निशाणा साधला. यावर आता राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी अनके सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो दाखवत टीका केली होती. त्यांच्या संबंधांवरून अनेक प्रश्नदेखील विचारले होते. मात्र, आजच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी कोणतेही उत्तर दिले नसल्याची टीका राहुल गांधींनी केली.
राहुल गांधी म्हणाले की, " पंतप्रधान मोदी शॉकमध्ये होते. त्यांनी मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. मी फक्त विचारले होते की उद्योगपती अदानींसोबत किती वेळा गेला होतात? किती वेळा त्यांना भेटला होतात? असे अगदी सोपे प्रश्न होते. पण त्यांनी आजच्या भाषणामध्ये एकही उत्तर दिले नाही. मी समाधानी तर नाहीच, पण यातून सत्य समोर येत आहेत. मोदी चौकशीबद्दल काहीही बोलले नाहीत. मित्र नाही ठीक आहे, पण मग चौकशी करतो, असे का म्हणाले नाहीत? शेल कंपन्या आहेत, बेनामी मालमत्ता आहे, या सगळ्यावर मोदी काहीच बोलले नाहीत. म्हणजे हे स्पष्ट आहे की ते अदानींना पाठीशी घालत आहेत. त्यांना मोदी वाचवत आहेत." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.