राहुल गांधी यांना जामीन मंजूर

या प्रकरणाची यापूर्वीची सुनावणी सुलतानपूर येथील विशेष न्यायालयात १८ जानेवारी रोजी झाली होती.
राहुल गांधी यांना जामीन मंजूर

सुलतानपूर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांची कथितरीत्या बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी २०१८ साली कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान अमित शहा यांची बदनामी केल्याचा आरोप होता. बंगळुरू येथे ८ मे २०१८ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी म्हटले होते की, भाजप प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारण करत असल्याचा प्रचार करते. पण त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष खूनखटल्यातील आरोपी आहेत. त्यावेळी अमित शहा भाजपचे अध्यक्ष होते. राहुल यांनी हे विधान करण्याच्या चार वर्षांपूर्वी मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाने अमित शहा यांना २००५ सालच्या खोट्या एन्काऊंटर प्रकरणातील आरोपांबाबत निर्दोष जाहीर केले होते. त्यामुळे अमित शहा यांची नाहक बदनामी होत असल्याची तक्रार विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी दाखल केली होती.

या प्रकरणाची यापूर्वीची सुनावणी सुलतानपूर येथील विशेष न्यायालयात १८ जानेवारी रोजी झाली होती. मात्र, भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी असल्याने राहुल गांधी त्या सुनावणीला उपस्थित राहू शकले नव्हते. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी राहुल सुलतानपूर न्यायालयापुढे शरण आले. त्यांना ३० ते ४५ मिनिटांसाठी प्रतीकात्मकरीत्या ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर न्यायालयापुढे त्यांचा जामीन अर्ज सादर करण्यात आला. तो न्यायालयाने स्वीकारला आणि राहुल यांना जामीन मंजूर केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in