
पुणे : लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या सुनावणीसाठी राहुल गांधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दाव्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने वकील ॲड. मिलिंद पवार यांनी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने अर्ज मंजूर केला. पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते असून त्यांना हाय सिक्युरिटी आहे. अशा परिस्थितीत न्यायालयसमोर स्वतः व्यक्तिश: उपस्थित राहणे सर्वांनाच त्रासदायक होईल. सर्वोच्य न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर उपस्थितीत राहू शकतात आणि म्हणून राहुल गांधी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या सुविधेवरून न्यायालयासमोर उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
पंचवीस हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
राहुल गांधी यांना पुणे जिल्हा न्यायालयातून दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात मेलवरून लिंक पाठवण्यात आली. दिल्ली येथील राहुल गांधी त्यांच्या कार्यालयातून न्यायालयासमोर जवळपास २० मिनिटे शांत बसून होते. अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांना खटल्यात जामीन मिळावा या साठी अर्ज केला. जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर करून रुपये पंचवीस हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांच्या वतीने माजी आमदार मोहन जोशी यांनी राहुल गांधी यांना जामीन दिला.