
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कर्नाटकमध्ये प्रचारसभेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक रॅलीमध्ये संबोधन केले. ते म्हणाले की, "प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज दिली जाईल. तसेच, प्रत्येक महिलेला आमच्या सरकारकडून दरमहा २००० रुपये दिले जाणार आहेत. तर, दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाला १० किलो तांदूळ मोफत देण्यात येतील. तसेच, राज्यातील प्रत्येक पदवीधराला ३००० रुपये आणि डिप्लोमाधारकाला २ वर्षांसाठी दरमहा १५०० रुपये दिले जातील." असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, "पंतप्रधान मोदी, तुम्ही अदानीला हजारो कोटी रुपये देऊ शकता, तर आम्ही गरीब, महिला आणि तरुणांना पैसे देऊ शकतो. तुम्ही अदानींना मनापासून मदत केली, आम्ही कर्नाटकच्या जनतेला मनापासून मदत करू शकतो. गौतम अदानी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत." असे म्हणत पुन्हा एकदा अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, "मी संसदेत विचारले की अदानींच्या शेल कंपनीचे २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? त्यानंतर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. खरं तर, विरोधक संसद थांबवतात पण पहिल्यांदाच सरकारच्या मंत्र्यांनी संसद थांबवली. मला संसदेतून काढून टाकू आणि घाबरवू असा भाजपचा विचार आहे. पण मी त्यांना घाबरत नाही. उत्तर मिळेपर्यंत मी थांबणार नाही." अशी टीका त्यांनी केली.