स्टालिन, विजय, ममतांशी राहुल यांनी साधला संवाद

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, द्रमुक प्रमुख एम.के. स्टालिन आणि टीव्हीके नेते विजय यांच्याशी संवाद साधला. विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित राज्यांतील कामगिरीबाबत ही चर्चा केली, अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.
स्टालिन, विजय, ममतांशी राहुल यांनी साधला संवाद
Published on

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, द्रमुक प्रमुख एम.के. स्टालिन आणि टीव्हीके नेते विजय यांच्याशी संवाद साधला. विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित राज्यांतील कामगिरीबाबत ही चर्चा केली, अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.

जयराम रमेश यांनी एक्सवर या संवादाचा तपशील शेअर करताना म्हटले की, "आज संध्याकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी आणि थिरू एम. के. स्टालिन यांच्याशी निवडणूक निकालांबाबत चर्चा केली. तसेच, त्यांनी टीव्हीकेचे अध्यक्ष थिरू विजय यांचे अभिनंदन केले. केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. या विजयाबद्दल जनतेचे आभार मानताना त्यांनी लवकरच केरळचा दौरा करणार असल्याचेही स्पष्ट केले.

"मी आधी म्हटल्याप्रमाणे, केरळकडे प्रतिभा आहे आणि प्रचंड क्षमताही. आता केरळमध्ये ही क्षमता सार्थ ठरवणारे 'व्हिजन' असलेले यूडीएफ सरकार आले आहे. मी माझ्या केरळमधील कुटुंबाला लवकरच भेटण्यास उत्सुक आहे," असे राहुल यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये नमूद केले.

प्रियांकाची कृतज्ञता

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनीही केरळमधील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विशेषतः वायनाड जिल्ह्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, वायनाडमधील जनतेने जिल्ह्यातील सर्व ७ जागा यूडीएफला देऊन आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

"वायनाडमधील माझ्या कुटुंबाने यूडीएफवर विश्वास ठेवत ७ पैकी ७ जागांवर विजय मिळवून दिला आहे. आता वायनाडच्या विकासासाठी ८ प्रतिनिधी मिळून काम करतील. आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू," असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच येत्या पाच वर्षांत जनतेला दिलेल्या आश्वासनांची प्रामाणिकपणे आणि नम्रतेने पूर्तता करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in